Dhirendra Shastri : रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या कार्यक्रमावरुन आणि त्यातल्या वक्तव्यावरुन वाद रंगला आहे. रणवीर अलाहाबादियाने एक अश्लाघ्य वक्तव्य केलं. ज्या वक्तव्याचे पडसाद संसदेत उमटले. याबाबत आता धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया समोर आली आहे. अशा लोकांना मुळीच माफ करता कामा नये असं धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर अलाहाबादियाने नेमकं काय म्हटलं होतं?

‘इंडियाज गॉट लेटेंट’ नावच्या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यानंतर वादाला तोंड फुटलं. रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्यानंतर रणवीरने माफीही मागितली. मात्र त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसंच रणवीर विरोधात जोरदार टीकाही होताना दिसते आहे. बागेश्वर धाम सरकारचे धीरेंद्र शास्त्री यांनी रणवीर आणि समय रैनाला माफ करता कामा नये असं म्हटलं आहे.

काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?

“देशाच्या सनातन संस्कृतीशी जे लोक खेळ करत आहेत असे लोक निर्दयी आहेत. सरकारने अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. या दोघांनी खूप घाणेरड्या गोष्टी बोलल्या आहेत. अशा लोकांना माफ करु नका त्यांना मनातून काढून टाका. आम्ही कायमच सांगत असतो की एखादा व्यक्ती कसा आहे ते थोडं त्याच्याबद्दल विचार करुन ठरवा. मात्र या दोघांना माफ करण्याचा काही प्रश्नच येत नाही. या दोघांना माफ करु नका तर मनातून काढून टाका.” असं आवाहन धीरेंद्र शास्त्रींनी केलं आहे. तसंच अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे असंही शास्त्री यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात आज अपूर्वा मखिजा आणि आशिष चंचलानी यांचेही जबाब नोंदवण्यात आले. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

अपूर्वा मखिजा आणि आशिष चंचलानी यांनी काय सांगितलं?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्स अपूर्वा मखिजा आणि युट्यूबर आशिष चंचलानी या दोघांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला. समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये ज्या काही अश्लील कमेंट्स करण्यात आल्या त्यावरुन बराच वादंग झाला होता. यानंतर पोलिसांनी अपूर्वा मखिजा आणि आशिष चंचलानी या दोघांनीही जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं होतं. या दोघांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. या दोघांनीही सांगितलं की सदरचा शो हा स्क्रिप्टेड वगैरे काहीही नव्हता. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक आणि जजेस हे उत्स्फुर्तपणे बोलत होते. अशी माहिती या दोघांनी पोलिसांना त्यांच्या जबाबात दिली. या दोघांनी पोलिसांना असंही सांगितलं की इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये जे जजेस सहभागी होतात त्यांना कुठलाही मोबदला किंवा मानधन दिलं जात नाही. तसंच जो कंटेट पोस्ट केला जातो तो पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तो कंटेट सोशल मीडियावर पोस्ट केला जातो. तसंच या शोसाठी जि तिकिटं असतात त्या तिकिटांमधून शोमध्ये जो जिंकतो त्याला बक्षीस दिलं जातं. असंही या दोघांनी पोलिसांना सांगितल्याचं ANI ने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhirendra shastri reaction about ranveer allahbadia and samay raina said not to be forgiven them scj