Dhirendra Shastri on Aurangzeb’s Tomb : “औरंगजेबाच्या कबरीवर प्रेम असणाऱ्यांनी स्वतःच्या घरात त्याची कबर बनवावी”, असं वक्तव्य बागेश्वर धामचे विठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं आहे. मुघल बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरून चालू असलेल्या वादात आता धीरेंद्र शास्त्री यांनी देखील उडी घेतली आहे. ते म्हणाले, “ज्या औरंगजेबाने देश तोडण्याचं काम केलं त्याच्या आठवणी नष्ट केल्या पाहिजेत, त्याचं नामोनिशान मिटवलं पाहिजे.”

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “औरंगजेबाचं नामोनिशान मिटवून टाकलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, औरंगजेबाने चांगली कामं देखील केली होती. मीही ते स्वीकारतो. परंतु, कोणी तुमच्या कानशीलात वाजवली आणि नंतर तुम्हाला पाणी देखील पाजलं तर तुम्ही नेमकं काय लक्षात ठेवाल? असंही नाही की त्याने (औरंगजेब) केवळ चांगलीच कामं केली होती. त्याने देश तोडण्याचं काम केलं होतं. त्यामुळे औरंगजेब हा महान असू शकत नाही. त्याची कबर तशीच ठेवण्याचं कारण नाही. त्यामुळे ज्या कोणाचं औरंगजेबाच्या कबरीवर प्रेम असेल त्याने त्याच्या घरातच त्याची कबर बांधून घ्यावी.” टीव्ही ९ नेटवर्कच्या एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेब हा मुद्दा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वादाच्या केंद्रस्थानी आहे. औरंगजेबाची कबर हटवावी, या मागणीने आता चांगलाच जोर धरला आहे. अलीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शिक ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मात्र, औरंगजेबाने ज्या क्रूरतेने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती, त्याचं चित्रणही या चित्रपटात करण्यात आलं आहे.

नेमका वाद काय?

हा चित्रपट पाहून लोकांचा औरंगजेबाबद्दलचा राग उफाळून आलेला असतानाच मानखुर्द-शिवाजीनगरचे (मुंबई) आमदार व समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली होती. त्यामुळे लोकांचा राग आणखी तीव्र झाला. याचे विधानसभेतही पडसाद उमटले. पाठोपाठ बजरंग दलाने पत्रकार परिषद घेऊन औरंगजेबाची खुलताबाद (जिल्हा – छत्रपती संभाजीनगर) येथील कबर नष्ट करण्याची मागणी केली. त्यासाठी आंदोलनही केलं. पाठोपाठ औरंगजेब प्रकरणावरून नागपुरात दंगलही झाली. या सगळ्या घडामोडींमुळे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असतानाच आता धीरेंद्र शास्त्री यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.