आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अव्वलस्थानी असणारे उद्योगपती गौतम अदाणी हे देशातील अनेक उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहेत. मात्र गौतम अदाणींचं प्रेरणास्थान कोण आहे? याचं उत्तर त्यांनी स्वत: दिलं आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदाणी यांनी याचा खुलासा केला असून धीरुभाई अंबानींकडून आपण फार प्रेरित झालो असल्याचं सांगितलं आहे.
“देशातील करोडो उद्योजकांसाठी धीरुभाई अंबानी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी एक नम्र व्यक्ती कोणत्याही पाठिंबा किंवा संसाधानांशिवाय तसंच सर्व अडचणींवर मात करत कशाप्रकारे एक जागतिक दर्जाच्या व्यवसायाची स्थापन करु शकतो आणि मोठा वारसा मागे सोडू शकतो हे दाखवून दिलं आहे,” असं गौतम अदाणी म्हणाले आहे.
“पहिल्या पिढीचे उद्योजक आणि फार नम्रपणे सुरुवात करणाऱ्या धीरुभाई अंबानींकडून मी खूप प्रेरित आहे,” असं गौतम अदाणींनी सांगितलं आहे. गौतम अदानी यांनी यावेळी इतर अनेक मुद्द्यांवरही भाष्य केलं.
गौतम अदाणी यांची संपत्ती २०२२ मध्ये दुप्पट झाली असून, त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत अदाणी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
इतकी श्रीमंती तसंच श्रीमंतांच्या यादीत भारतात पहिल्या आणि जगात तिसऱ्या स्थानावर आहोत याबद्दल काय वाटतं असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मीडियाने उगाच हे सर्व वाढवून सांगितलं आहे. मी पहिल्या पिढीचा उद्योजक आहे, ज्याने शून्यापासून सुरुवात केली होती. मला आव्हानांचा सामना करायला आवडतं. आव्हान जितकं मोठं असेल, तितका मी जास्त आनंदी असतो. माझ्यासाठी, लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची संधी आणि तसंच देशाच्या उभारणीत योगदान देणे हे काही संपत्ती क्रमवारीत किंवा इतर कोणत्याही मूल्यमापन सूचीमध्ये असण्यापेक्षा खूप समाधानकारक आणि महत्त्वाचं आहे”.
पायाभूत सुविधांची निर्मिती करत देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आपण देवाचे आभारी असल्याचंही गौतम अदाणी यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो? असं विचारण्यात आलं असता अदाणी म्हणाले “हे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं वर्ष होतं. यावर्षी मी ६० वा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी माझ्या कुटुंबाने अदाणी फाऊंडेशनला माझ्या मनाच्या जवळ असणाऱ्या तीन सामाजिक कारणांसाठी ६० हजार कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही राष्ट्राचा पाया असणाऱ्या शिक्षण, आरोग्यसेवा आणि कौशल्य विकासासाठी हे पैसे खर्च होणार आहेत”.