केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेवर म्हणजेच भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यावर टीका केली आहे. ज्या लोकांची ओळखच अन्यायासाठी झाली आहे ते लोक आता भारत न्याय यात्रा काढत आहेत अशा तिखट शब्दांमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. स्मृती इराणी यांना एका कार्यक्रमात राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. राहुल गांधी यांची ही यात्रा जानेवारी महिन्यात निघणार आहे. भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा असणार आहे. ही यात्रा मणिपूर ते मुंबई अशी असणार आहे.
जानेवारी महिन्यात निघणार यात्रा
लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात राहुल गांधींच्या नेतृत्वात १४ जानेवारीपासून भारत न्याय यात्रा सुरु होते आहे. पूर्वेपासून पश्चिमेकडे ही जाणारी ही यात्रा १४ राज्यांमधून जाणार आहे. ८५ जिल्ह्यांचा यात समावेश असणार आहे. हा टप्पा ६ हजार २०० किमींचा असणार आहे. याआधी राहुल गांधींच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा निघाली होती.
स्मृती इराणी या दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्या दरम्यान त्या गौरीगंज येथील जवाहर नवोद विद्यालयात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी जेव्हा त्यांना राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेबाबत विचारलं तेव्हा त्यांनी तिखट शब्दांमध्ये टीका केली. तसंच ही यात्रा म्हणजे निव्वळ ढोंग आहे. ज्यांनी अन्याय केला तेच आता न्याय यात्रा काढत ढोंग करत आहेत असं स्मृती इराणींनी म्हटलंय.
आणखी काय म्हणाल्या स्मृती इराणी?
भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आयुष्मान भारत योजनेतून गोर-गरीबांना कसा आधार मिळतो आहे ते सांगितलं. तसंच १० हजार जनसेवा मेडिकल्समधून लोकांना ९० टक्के सवलतीच्या दरांमध्ये औषधं मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच अमेठीतल्या इतर सेवांबाबतही त्यांनी माहिती दिली.