देशी बनावटीच्या एएलएच-ध्रुव या हेलिकॉप्टरने एकूण एक लाख तासांचे उड्डाण बुधवारी पूर्ण केले. लष्करी आणि नागरी उड्डाणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) या कंपनीने या हेलिकॉप्टरची रचना करून ते विकसित केले होते आणि कंपनीचे त्याचे परिरक्षण करीत होती.
‘आयए-३१०४’ या हेलिकॉप्टरने बुधवारी सकाळी उड्डाण करून हा मैलाचा दगड काबीज केला. ध्रुव हेलिकॉप्टरने आपली क्षमता सिद्ध केल्याचा आम्हाला अभिमान आहे. या क्षमतेची हेलिकॉप्टर तयार करणारा भारत हा जगातील सहावा देश आहे. इक्वेडोर, मॉरिशस, नेपाळ आणि मालदीव यांना भारताने ध्रुव हेलिकॉप्टर निर्यात केली आहेत, असे एचएएल कंपनीचे अध्यक्ष आर. के. त्यागी यांनी सांगितले.
एखाद्या यंत्राने एक लाख तास उड्डाण करणे हे साध्य करणे अशक्यप्राय गोष्ट होती. कोणत्याही वैमानिकासाठी हे स्वप्नातील यंत्र आहे, असे लेफ्ट. कर्नल कपिल अग्रवाल यांनी म्हटले आहे. भारतीय संरक्षण दलाच्या सेवेत सध्या १३२ ध्रुव हेलिकॉप्टर आहेत.