मधुमेहावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एका औषधी गोळीमुळे वृद्धत्त्वाच्या परिणामांना आळा बसून, आयुष्यमानामध्ये वाढ होऊ शकते. उंदरावर केलेल्या प्रयोगाच्या अभ्यासामधून ही बाब समोर आली आहे.
मेटफॉर्मिनच्या कमी मात्रेमुळे एका मध्यम वयाच्या उंदराचे आयुष्यमान ५ टक्क्यांनी वाढल्याचा आणि त्या उंदराला वाढत्या वयामुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण मिळाल्याचा दावा या प्रयोगावर कामकरणाऱ्या डॉक्टरांनी केला.
या उलट मेटफॉर्मिनची मोठी मात्रा विषारी ठरत असून, उंदराचे आयुष्यमान कमी होते. मेटफॉर्मिनच्या कमी मात्रेमुळे उष्मांक नियंत्रणातून उंदरांच्या आयुष्यमानात वाढ झाल्याचे राष्ट्रीय आयुर्मान संस्था बाल्टीमोर, मेरिलँड, अमेरिकेचे राफेल दि कोबो यांनी सांगितल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.
“हे अत्यंत आशादायी निकाल असून, वैद्यकीय अभ्यासाच्या माध्यमातून माणसांवरील उपचारासाठी त्याचा वापर होणे गरजेचे आहे”, असे कोबो म्हणाले.
मेटफॉर्मिन मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे औषध असून, दुसऱ्या स्तरातील मधुमेहाच्या उपचारासाठी त्याचा वापर केला जात असल्याचे कोबो म्हणाले.   

Story img Loader