तुम्ही तुमचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांशी जोडले अर्थात लिंक केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ज्या पॅनकार्डधारकांनी त्यांचे पॅनकार्ड आधारसोबत लिंक केलेले नाही त्यांचे पॅनकार्ड १ जुलैपासून बाद होणार नाहीये. होय, सुरूवातीच्या अहवालांमध्ये सरकारतर्फे पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची मुदत १ जुलैपर्यंत देण्यात आलेली होती. ज्यानुसार पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे करण्यात आले होते. तसेच मुदतीपर्यंत पॅनकार्ड लिंक करण्यात आले नाही तर ते बाद होईल असेही आयकर विभागाने म्हटले होते. मात्र आता ही सक्ती काही दिवसांसाठी शिथील करण्यात आली आहे. नेमक्या किती तारखेपर्यंत ही मुदत आहे हे लवकरच आयकर विभातर्फे जाहीर करण्यात येणार आहे.

आज मध्यरात्रीपासून देशात जीएसटी नावाची नवी करप्रणाली लागू होते आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या कररचनेत पहिल्यांदा बदल होतो आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने आधार आणि पॅनकार्ड एकमेकांसोबत संलग्न करण्याचे आदेश देऊन त्याची मुदत १ जुलैपर्यंतच ठेवली होती. अन्यथा तुमचे पॅनकार्ड बाद होईल असे म्हटले होते. मात्र आयकर विभागाने दिलेल्या नव्या माहितीनुसार ही मुदत वाढवण्यात आली आहे. आधार आणि पॅन लिंक करताना अनेक लोकांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणींमध्ये आधार आणि पॅन लिंक करण्याची वेबसाईट ओपन न होणे ही मुख्य अडचण आहे. त्यामुळे पॅनकार्ड उद्यापासून अर्थात १ जुलैपासून बाद होणार नाहीयेत. लवकरच यासंदर्भातली तारीख जाहीर करण्यात येईल असे आयकर विभागाने म्हटले आहे.

पॅनकार्ड आणि आधारकार्डचे क्रमांक एकमेकांना जोडणे बंधनकारक आहे अन्यथा पॅनकार्ड बाद ठरवण्यात येईल असा आदेश केंद्र सरकारने काढला होता. मात्र या आदेशाला काही प्रमाणात मुदतवाढ देण्यात आली आहे. लवकरच ही तारीख जाहीर करण्यात येईल असे आयकर विभागाने म्हटले आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे आधार आणि पॅन लिंक केले नसेल तर चिंता करू नका, या दोन्हीची सक्ती आहे मात्र अगदी उद्यापासून काही तुमचे पॅनकार्ड बाद ठरणार नाही. त्यामुळे ज्यांनी पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांशी लिंक केलेले नाही किंवा ज्यांना यासाठीच्या अडचणी येत आहेत त्यांना यासंदर्भात काही अंशी दिलासा मिळाला आहे.

Story img Loader