‘डीडीसीए’ भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे स्पष्टीकरण
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष म्हणून काम करताना आपण कोणाकडून कधीही एक छदामही घेतलेला नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी दिल्लीतील न्यायालयात स्पष्ट केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत काम करणाऱ्या एका व्यक्तीची सीबीआय चौकशी सुरू असून त्यापासून दुसरीकडे लक्ष वळविण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही जेटली यांनी या वेळी केला.
डीडीसीएचा अध्यक्ष असताना मोठय़ा प्रमाणावर पैशांचा गैरव्यवहार करण्यात आला आणि आपण त्याचे एक लाभार्थी आहोत हा केजरीवाल आणि कुमार विश्वास, आशुतोष, संजयसिंह, राघव चढ्ढा आणि दीपक वाजपेयी यांनी केलेला आरोप निखालस खोटा आहे, असेही जेटली म्हणाले.
केजरीवाल आणि अन्य व्यक्तींविरुद्ध जेटली यांनी फौजदारी स्वरूपाची तक्रार केली असून त्याच्या पुष्टय़र्थ आपले म्हणणे मांडण्यासाठी जेटली मंगळवारी अत्यंत कडेकोट बंदोबस्तात मुख्य महानगर दंडाधिकारी संजय खनगवाल यांच्यासमोर हजर राहिले. केजरीवाल आणि अन्य व्यक्तींनी आपल्याविरुद्ध आणि आपल्या कुटुंबीयांविरुद्ध खोटी आणि बदनामीकारक निवेदने दिली, असे जेटली म्हणाले.
आपण अध्यक्षपदी असताना फिरोजशहा कोटला स्टेडियम बांधण्यात आले आणि त्यावेळी आपल्याला पैसे मिळाले हा केजरीवाल यांचा आरोप धादांत खोटा आहे. संचालक मंडळाने कामकाजावर देखरेख करण्यासाठी समिती नियुक्त केली होती आणि आपण त्या समितीचा सदस्य नव्हतो, असेही जेटली म्हणाले.
जेटली यांच्यासह न्यायालयाने ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांचेही म्हणणे नोंदविले. या प्रकरणातील तक्रारदारांचे साक्षीदार म्हणून शर्मा हजर होते.
सहा व्यक्तींनी आपल्याविरुद्ध ट्विटर आणि फेसबुकवर जे वक्तव्य केले त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला तडा गेला आणि त्यानंतर आपण बदनामीचा खटला दाखल केला. आपच्या नेत्यांनी केलेल्या खोटय़ा बदनामीकारक आरोपांमुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसला आणि जनतेच्या मनात आपल्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले, असेही जेटली म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा