आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना प्रवास कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी आपण कुठलीही शिफारस ब्रिटनला केली नाही, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. मानवतेच्या आधारे आपण त्यांची पत्नी आजारी असल्याच्या कारणाने कागदपत्रे उपलब्ध करून दिल्याचे सांगणाऱ्या सुषमा स्वराज यांनी आता घूमजाव केले आहे. या प्रकरणात सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली असून त्यावर संसदेत गेले काही दिवस गोंधळ चालू आहे. त्यामुळे कामकाज होऊ शकलेले नाही.
काही प्रश्नांवर ट्विटरवर दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, ललित मोदी यांना प्रवास कागदपत्रे मिळावीत यासाठी आपण कुणाकडेही शिफारस केलेली नाही, हे वारंवार आपण सांगितले आहे. आपण ही बाब ब्रिटनच्या सरकारवर सोपवली होती व त्यांच्या कायदे व नियमांनुसार निर्णय घेण्यास सांगितले होते व त्यामुळे त्यांनी त्यानुसारच मोदींना कागदपत्रे दिली. मंत्री म्हणून आपण संसदेला जबाबदार आहोत. देशाला माहिती देण्याचा तो एकच मंच आहे. लोकांनी एक ट्वीट केला तरी आपण लोकांना मदत करतो. सुषमा स्वराज यांच्या ललित मोदी प्रकरणातील सहभागामुळे संसद ठप्प झाली असून विरोधक राजीनाम्याची मागणी करीत आहेत. चालू पावसाळी अधिवेशनात या विषयावर जेव्हा चर्चा होईल त्यात आपण युक्तिवाद करायला तयार आहोत, पण काँग्रेसचे सदस्य कामकाज व चर्चा होऊ देत नाहीत. ललित मोदी यांना लंडनला जाण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून कागदपत्रे मिळावीत, यासाठी ब्रिटिश खासदार कीथ वाझ यांना दूरध्वनी केला होता की नाही, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की हे अगदी चुकीचे आहे. आपण ललित मोदी यांना प्रवास कागदपत्रे द्यावीत अशी शिफारस कधीही केलेली नाही. त्यांच्या कायदे व नियमात बसेल त्याप्रमाणे निर्णय घेण्याचा पर्याय आपण ब्रिटन सरकारवर सोडला होता व त्याप्रमाणे त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा