आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कथित गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना मानवतेच्या मुद्यावर मदत केल्याचे ट्विट काही दिवसांपूर्वी करणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना कधीही मदत केली नसल्याचे स्पष्टीकरण राज्यसभेत दिले.
स्वराज यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यसभेत सुरू असलेल्या अभूतपूर्व गोंधळात स्वराज म्हणाल्या की, ललित मोदी यांच्या प्रवासाविषयक कागदपत्रांसाठी मी कधीही ब्रिटीश सरकारला विनंती केलेली नाही. ब्रिटीश सरकारकडे शिफारस केली नाही. परंतु तरीही माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. मी कोणत्याही चर्चेला तयार आहे.
काँग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे त्यांचे वक्तव्य अर्धवट राहिले. स्वराज यांनी ललित मोदी यांना मदत केल्याच्या आरोपावरून गेल्या पंधरा दिवसांपासून संसदेचे कामकाज ठप्प झाले आहे. स्वतवरील आरोपांना पहिल्यांदाच उत्तर देण्याचा प्रयत्न स्वराज यांनी केला. त्यांनी निवेदन देण्यापूर्वी राज्यसभा उपसभापतींची परवानगी घेतली नसल्याचा आक्षेप काँग्रेसच्या मधुसूदन मिस्त्री यांनी घेतला. स्वराज यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी मिस्त्री यांनी उपसभापती पी.जे. कुरीयन यांच्याकडे केली. हा संसदीय नियमांचा भंग असल्याचे ते वारंवार सांगत होते. काँग्रेसच्या प्रमोद तिवारी यांनीदेखील त्यांचीच रि ओढली. स्वराज यांना बोलण्याची सूचना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. त्यामुळे त्यांचे वक्तव्य कामकाजातून काढण्यात यावे. उपसभापतींच्या परवानगीशिवाय त्या कशा बोलल्या, अशा प्रश्नांची प्रश्नांची सरबत्ती मिस्त्री व तिवारी करीत होते. हाच धागा पकडून जेटली यांनी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने सभागृहात (तुमच्या) परवानगीशिवाय स्वराज यांच्यावर जे आरोप होत आहेत, ते देखील कामकाजातून वगळण्याची मागणी त्यांनी केली. त्यास काँग्रेसचे सभागृह नेते आनंद शर्मा यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, स्वराज निवेदन देणार असल्याचे कामकाजात कुठेही नव्हते. जेटली यांनी त्यांना निवेदन देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचे वक्तव्य कामकाजातून वगळण्यात यावे व प्रसिद्ध न करण्याची सूचना प्रसारमाध्यमांना करण्यात यावी, अशी मागणी शर्मा यांनी केली. नियम पुस्तकाचा हवाला देणाऱ्या शर्मा यांना जेटली यांनी फैलावर घेतले. सातत्याने त्यांच्यावर आरोप करताना, सभागृहात पोस्टरबाजी करताना, घोषणा देताना तुम्ही कोणत्या नियमांचा आधार घेतला? असा प्रश्न त्यांनी विचारला.
ललित मोदींना मदत नाही!
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कथित गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना मानवतेच्या मुद्यावर मदत केल्याचे ट्विट काही दिवसांपूर्वी करणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना कधीही मदत केली...
First published on: 04-08-2015 at 12:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did not request british govt for travel documents for lalit modi sushma swaraj