मंगळावर अब्जावधी वर्षांपूर्वी दोन मोठय़ा उल्कापाषाणांच्या आघाताने दोन मोठय़ा सुनामी येऊन गेल्या व त्यामुळे मंगळाच्या पृष्ठभूमीवर त्याच्या खुणा अजूनही दिसतात. मंगळावर शीत, क्षारयुक्त महासागर एकेकाळी होते म्हणजेच तेथे जीवसृष्टीस अनुकूल वातावरण होते असे एका अभ्यासात म्हटले आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे वैज्ञानिक अल्बटरे फेरन यांनी सांगितले की, ३.४ अब्ज वर्षांपूर्वी मोठा उल्कापाषाण मंगळावर आदळला होता त्यावेळी पहिल्यांदा सुनामी लाटा आल्या. मंगळावरील या सुनामी लाटा या पाण्याच्या होत्या व त्यामुळे काही मार्गिका तयार होऊन नंतर पाणी परत सागरात गेले, असे सेंटर ऑफ अ‍ॅस्ट्रोबायॉलॉजी या स्पेनमधील संस्थेचे मुख्य संशोधक फेरन यांनी सांगितले. आणखी एक उल्कापाषाण तेथे कालांतराने आदळला होता व लाखो वर्षांच्या दरम्यान हे दोन उल्कापाषाण आघात झाले होते. त्यानंतर मंगळावरील वातावरणात खूप बदल झाला. पाण्याचे रूपांतर बर्फात झाले. महासागरी जलपातळी कमी झाली. मूळ सागरीरेषेपासून ती दुय्यम रेषेवर गेली कारण हवामान खूप थंड बनत गेले. दुसऱ्या सुनामीनंतर तेथे बर्फाचे गोलाकार ओंडकेच तयार झाले. ते बर्फाचे ठोकळे जमिनीवर तयार झाले व त्यांचा आकार एवढा मोठा झाला की ते परत सागरात जाऊ शकले नाहीत त्यावेळी सागर अंशत: गोठलेला होता. मंगळावर एकेकाळी थंड महासागर होते असे यातून दिसते. बर्फाच्या मोठय़ा ठोकळ्यांच्या सीमा ठरलेल्या होत्या व त्यांचे आकारही ठरलेले होते. जर थंड व क्षारयुक्त पाणी असेल तर टोकाच्या परिस्थितीत ते गोठत नाही कारण क्षार पाण्याला द्रव रूपात ठेवतात, जर मंगळावर तसे असेल तर सुनामीच्या वेळी तयार झालेले बर्फाचे ठोकळे हे जैविक अवशेष शोधण्यासाठी योग्य ठिकाणे आहेत. त्यावेळी सुनामीच्या पाण्याखाली गेलेले काही भाग आम्ही शोधले आहेत. तेथे काही तळ्यासारख्या भागात आलेले पाणी बाष्पकांनी युक्त होते, असे ग्रहविज्ञान संस्थेचे अ‍ॅलेक्सिस रॉड्रिग्युझ यांनी सांगितले. सायंटिफिक रिपोर्ट्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा