बेधडक आणि सडेतोड उत्तरांसाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका नेटिझनलाही असंच चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी विचारलेल्या प्रश्नावरून त्यांनी इस्टा स्टोरीवरूनच संबंधित नेटिझन्सला सुनावलं आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी Ask Me Anything असा प्रश्न त्यांच्या इस्टाग्राम स्टोरीवर विचारला होता. त्यावर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अनेक प्रश्नांची त्यांनी सडेतोड आणि हटके उत्तरे दिली आहेत. परंतु, त्यांना सर्वांत शेवटी एक खासगी प्रश्न विचारण्यात आला. तुमचं लग्न तुमच्या मैत्रिणीच्या पतीशी झालंय का? असा खोचक प्रश्न एका नेटिझनने विचारला. त्यावर स्मृती इराणी यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या, “नाही. मोना या माझ्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे त्या माझ्या ‘बचपन की सहेली’ कशा असतील? ती राजकारणी नाही. त्यामुळे तिला यात खेचू नका. माझ्याशी भांडा, माझ्याशी वाद घाला, माझी बदनामी करा पण राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या नागरिकाला तुमच्यासोबत गटारात ओढू नका. ती आदरास पात्र आहे.”
स्मृती इराणी यांनी २००१ साली झुबिन इराणी यांच्याशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. झुबिन यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मोना आहे. त्या जोडप्यालाही एक मुलगी आहे.
Ask me Anything च्या खेळात स्मृती इराणींना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पुरण पोळी आवडते का? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी ‘लय आवडते’ असं मराठीतून उत्तर दिलं.
“एवढ्या भाषा कुठून शिकलात?” असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्या म्हणाल्या की, “आजोबा पंजाबी, आजी मराठी, आईची आई आसामी, आईचे वडील बंगाली, नवरा गुजराती आहेत. तर, इंग्रजी भाषा शाळेतून शिकले.”
इस्टाग्रामर स्टोरीवरील ASK ME ANYTHING हे एक प्रसिद्ध टूल आहे. याद्वारे अनेकजण प्रश्नोत्तराचा खेळ खेळतात. अनेक नेटिझन्स यावर प्रश्न विचारतात आणि संबंधित व्यक्ती त्याचं योग्य उत्तर देते. सेलिब्रिटी मंडळींकडून हे टूल सर्वाधिक वेळा वापरलं जातं. परंतु, राजकारणी मंडळी इन्स्टाग्रामवर तशी फारशी सक्रीय नसतात. परंतु, स्मृती इराणींनी मात्र या छेद देत इन्स्टाग्रामवरील ASK ME ANYTHING टूलचा वापर करून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.