पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असा राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपाने सर्वस्व पणाला लावलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांच्या टीकेला तृणमूलने प्रत्युत्तर दिलं असून, २०२४ लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात उमेदवार देण्याचं आव्हान दिलं आहे.

आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पक्षातून बाहेर पडून भाजपाकडून निवडणूक लढवणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना आव्हान दिलं आहे. नंदीग्राममध्ये ममता आणि सुवेंदू यांच्या मोठी लढत होत असून, गुरूवारी (१ एप्रिल) मतदानही पार पडलं आहे. नंदीग्राममध्ये मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतांवर निशाणा साधला होता.

आणखी वाचा- “मोदी रोडरोमिओप्रमाणे….”, ममता बॅनर्जींवरील टीकेवरुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचा संताप

ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव होणार असून, त्या दुसऱ्या मतदारसंघातून अर्ज भरणार असल्याची चर्चा सुरू आहे, असा टोला मोदींनी लगावला होता. नरेंद्र मोदी यांच्या टीकेला तृणमूल काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. तृणमूल काँग्रेसनं ममता दुसऱ्या मतदारसंघातून लढणार असल्याचं वृत्त फेटाळून लावतानाच मोदींना आव्हान दिलं आहे.

“दीदी, नंदीग्राममधून जिंकत आहे. दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. नरेंद्र मोदीजी पश्चिम बंगालमध्ये अर्ज भरण्याच्या अखेरीस तुमचं खोटं लोकांच्या नजरेत येण्याच्या आधीच लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न थांबवा. आपण २०२४ साठी सुरक्षित मतदासंघ शोधा, कारण वाराणसीमध्ये तुम्हाला आव्हान दिलं जाईल,” असं म्हणत तृणमूलने मोदींवर पलटवार केला आहे.

आणखी वाचा- ममता बॅनर्जींनी मतदान केंद्रावरुन थेट राज्यपालांना केला फोन; म्हणाल्या…

काय म्हणाले होते मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेतून ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. “दीदी, तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहात, ही अफवा खरी आहे का? पहिल्यांदा तुम्ही नंदीग्राममध्ये गेलात आणि लोकांनी तुम्हाला उत्तर दिलं. जर तुम्ही इतर कुठेही गेलात तर बंगालचे लोक तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार आहेत?,” अशी टीका मोदींनी केली होती.

Story img Loader