पेट्रोलचे दर शुक्रवारपासून प्रतिलिटर एक रुपयाने कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळाने अगोदरच तेल कंपन्यांना दिलेल्या आदेशानुसार डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पैशांची वाढ होणे अपेक्षित आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे पेट्रोलच्या दरात एक रुपयाने कपात होण्याची शक्यता आहे. डिझेलच्या दरांमुळे तेल कंपन्यांना प्रतिलिटर ११ रुपयांचा तोटा होत होता. तो कमी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक महिन्याला डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पैशांनी वाढ करण्याचा आदेश दिला. त्यानुसार येत्या एक दोन दिवसांत डिझेलचे दर ५० पैशांनी वाढणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त शुक्रवार संध्याकाळपर्यंत नवे दर जाहीर होतील आणि त्या दिवसाच्या मध्यरात्रीपासून ते लगेचच अंमलात आणले जातील.
पेट्रोलच्या दरात गेल्या दोन महिन्यात दोनदा वाढ करण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला पेट्रोल प्रतिलिटर दीड रुपयाने महागले. त्यानंतर याच महिन्यात दोन तारखेला पुन्हा प्रतिलिटर १.४० पैशांची वाढ करण्यात आली.

Story img Loader