सार्वजनिक तेल कंपन्यांना होणारा तोटा भरून निघेपर्यंत दरमहा डिझेलच्या दरात किंचित वाढ होणार असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलीयम मंत्री वीरप्पा मोईली यांनी शुक्रवारी येथे दिले.
केंद्र सरकारने डिझेलच्या दराबाबतचे धोरण १७ जानेवारीलाच बदलले असून पेट्रोलप्रमाणे हे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. डिझेलवर मोठय़ा प्रमाणात सरकारी सवलत असल्याने सार्वजनिक तेल कंपन्यांना लक्षणीय आर्थिक फटका बसत आहे. या पाश्र्वभूमीवर १७ जानेवारीला डिझेलच्या दरात प्रतिलिटर ४५ पैशांनी वाढ करण्यात आली होती. या नाममात्र दरवाढीनंतरही तेल कंपन्यांना डिझेलपोटी प्रतिलिटर सुमारे ११ रुपयांचा तोटा होत असल्याने सरकारने भविष्यातही डिझेल दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून पुढील सूचना मिळेपर्यंत तेल कंपन्यांना डिझेलच्या दरात दरमहा किमान ४० ते ५० पैशांनी वाढ करण्याची मुभा देण्यात आल्याने दरमहा ही दरवाढ होईल, असे मोईली यांनी सांगितले. चालू महिन्यात ही वाढ कधीपासून लागू होईल, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.