वाराणसी : आपला ‘छळ’ होत असल्यामुळे वाराणसीतील ज्ञानवापी मुद्दय़ाशी संबंधित सर्व खटल्यांतून माघार घेत आहोत, असे प्रमुख हिंदू पक्षकार जितेंद्र सिंह विसेन यांनी जाहीर केले आहे. विसेन हे विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख असून काही जणांनी स्वार्थासाठी या प्रकरणात उडी घेऊन हिंदूंचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे ज्ञानवापीवर दावा करणाऱ्या हिंदू पक्षकारांमधील तीव्र मतभेद प्रकर्षांने चव्हाटय़ावर आले आहेत.
‘मी व माझे कुटुंब (पत्नी किरण सिंह व पुतणी राखी सिंह) यांनी देशाच्या व धर्माच्या हितासाठी विविध न्यायालयांमध्ये ज्ञानवापीशी संबंधित जे खटले दाखल केले होते, त्या सर्व खटल्यांतून आम्ही माघार घेत आहोत,’ असे विसेन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हिंदूंसह समाजाच्या निरनिराळय़ा वर्गाकडून आम्हाला छळाला तोंड द्यावे लागत असून, अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. अशा परिस्थितीत, मर्यादित ताकद आणि संसाधनांमुळे मी यापुढे हे ‘धर्मयुद्ध’ लढू शकत नाही व त्यामुळे मी माघार घेत आहे. हे धर्मयुद्ध सुरू करून कदाचित मी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली, असेही विसेन म्हणाले.
विसेन यांचा दावा विसेन यांची पुतणी राखी सिंह यांच्यासह पाच महिलांनी ऑगस्ट २०२१ मध्ये श्रृंगार गौरीचा मूळ खटला दाखल केला होता. गौरीसह ज्ञानवापी मशीद परिसरातील देवी गौरीसह अन्य देवतांची दररोज पूजा करण्याची परवानगी याद्वारे त्यांनी मागितली होती. मात्र, राखी यांच्याशी झालेल्या मतभेदांनंतर अन्य चार महिलांनी विविध वकिलांमार्फत आणखी गुन्हे दाखल केले. २३ मे रोजी अलाहाबाद न्यायालयाने एकूण सात खटल्यांची एकत्रित सुनावणी घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे हिंदू पक्षकारांची बाजू कमकुवत झाली असून आता ज्ञानवापी मशिदीची जागा हिंदूंना कधीही मिळणार नाही, असा दावा विसेन यांनी केला आहे.