बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सल्लागार आणि चार वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी आर पाटील यांनी रविवारी राजीनामा दिला. त्यामुळे राज्य काँग्रेसमधील मतभेद आणि अंतर्गत सत्तासंघर्ष उघड झाल्याचे मानले जात आहे. सिद्धरामय्या यांचे खंदे समर्थक मानले जाणारे पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांना यांना धक्का बसला असून आपण त्यांच्याशी चर्चा करू असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. “पाटील यांचे राजीनामापत्र बंगळुरूहून आले आहे, मी ते वाचले नाही असे,” त्यांनी मैसुरूमध्ये पत्रकारांना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष उफाळत असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महिन्यात सिद्धरामय्या यांच्या समर्थक नेत्यांनी आयोजित केलेल्या भोजन बैठकांनंतर या सत्तासंघर्षाबद्दल चर्चा वाढल्या. सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यादरम्यान सत्तावाटपावरून मतभेद असल्याचे मानले जात असून राज्यात मुख्यमंत्रीपद फिरते ठेवावे अशी मागणी त्यामागे असल्याचे बोलले जाते. मात्र, सिद्धरामय्या यांनी अशा चर्चा नाकारल्या आहेत. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांच्या राजीनाम्यामागे सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील चढाओढीचे कारण नाही. खुद्द मुख्यमंत्रीच आपल्याला पुरेसे महत्त्व देत नसल्याचा समज होऊन ते नाराज असल्याचे सांगण्यात आले. पाटील हे कलबुर्गी जिल्ह्यातील असून शिवकुमार यांचा तिथे फारसा प्रभाव नाही. कलबुर्गी जिल्हा हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि पाटील यांचे खरगेंचा मुलगा व राज्यातील मंत्री प्रियांक खरगे यांच्याशी फारसे सख्य नाही.