देशांतील महानगरांतील रेल्वे या जीवनवाहिन्याच असल्या तरी त्या गाडय़ा विलंबाने धावण्याची सवयही लोकांना झाली आहेच. मात्र देशातील वाहतूकक्षेत्रात क्रांती घडविणारी ‘बुलेट ट्रेन’ रुळावर उतरण्याआधीच ‘अनिश्चित काळ विलंबाने’ येत असल्याची उद्घोषणा रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनीच शुक्रवारी केली आहे.
रेल्वे इलेक्ट्रिकल अभियंता संघटनेने ‘देशातील वेगवान गाडय़ांच्या मार्गातील अडचणी आणि पर्याय’ या विषयावर आयोजिलेल्या परिसंवादात ते बोलत होते.
देशात बुलेट ट्रेन आणण्याचा आमचा निर्धार असून त्यांचा प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असाच राहिला पाहिजे, असाही आमचा निश्चय आहे. मात्र ताशी ३५० किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या या गाडय़ा प्रत्यक्षात कधीपासून नागरिकांच्या सेवेत येतील, हे आत्ताच सांगणे कठीण आहे, असे बन्सल म्हणाले.
या बुलेट ट्रेनचा पथदर्शक प्रकल्प म्हणून मुंबई-अहमदाबाद मार्गाकडे पाहिले जात आहे. मात्र ५३४ कि.मी. लांबीच्या या प्रकल्पासाठीचा अंदाजे खर्चच ६३ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याने हा अत्यंत खर्चिक प्रकल्प नेमका कधीपर्यंत पूर्ण करता येईल, याबाबत आत्ताच काही सांगता येत नाही, अशी कबुली बन्सल यांनी दिली. हा प्रकल्प खाजगी उद्योगांच्या सहभागाने होणार असल्याने त्यातून सरकार, प्रवासी अर्थात नागरिक आणि खाजगी उद्योग या तिघांना समान लाभ झाला पाहिजे, असा आमचा दृष्टीकोन आहे, असेही बन्सल यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पासाठी रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद होणे कठीण आहे. मात्र त्यासाठी आवश्यक निधी कसा उभारता येईल, याचा विचार केला पाहिजे. राज्य सरकारांनीही त्यातला वाटा उचलला पाहिजे.
रेल्वेने वेगवान गाडय़ांसाठी सात मार्ग निवडले आहेत. त्यात दिल्ली-आग्रा-पटणा, हावडा-हलदिया, चेन्नई-बंगळुरू-तिरुवनंतपूरम आणि पुणे-मुंबई-अहमदाबाद यांचा समावेश आहे.
सध्याच्याच लोहमार्गावर गाडय़ांचा वेग वाढविणे शक्य आहे का, या मुद्दय़ाला स्पर्श करताना बन्सल म्हणाले, दिल्ली-मुंबई मार्गावरील गाडय़ांचा वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ही एकमेव गाडी दिल्ली-आग्रा टप्प्यात सर्वात वेगाने धावते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा