Digital arrest scam crack down: सायबर चोरट्यांनी सामान्यांची फसवणूक करण्यासाठी डिजिटल अरेस्ट हे नवे तंत्र शोधून काढले. यात आजवर हजारो भारतीय नागरिक बळी पडले आहेत. बंगळुरूमधील सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करणाऱ्या विजय कुमार (३९) या तरुणालाही डिजिटल अरेस्ट स्कॅमचा फटका बसला. विजय कुमारने शेअर मार्केटमध्ये दहा वर्षांपूर्वी ५० लाख गुंतविले होते. त्यावर त्याने ११ कोटींची कमाई केली, मात्र सायबर चोरट्यांनी या ११ कोटींवर डल्ला मारला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी ‘हवाला’द्वारे पैसे वळते केले, मात्र बंगळुरू पोलिसांनीय यातील मोठा भाग परत मिळविण्यात यश मिळवले आहे.
रविवारी (दि. १९ जानेवारी) बंगळुरू ईशान्यमधील सायबर क्राइम पोलिसांनी तीन आरोपींना अटक केल्याचे जाहीर केले. गुजरातमधील रहिवाशी करण (२४) आणि दिल्लीमधील तरुण नतानी (२६) तर गुजरातमधील सोन्याच्या विटांचा व्यापारी धवल भाई शाह (३५) याला अटक करण्यात आली. या तिघांनी विजय कुमारकडून ११.८३ रुपये लंपास केले होते. ही चोरी दुबईमधून हाताळली गेली, असेही आता चौकशीत समोर आले आहे.
डिजिटल अरेस्ट कशी झाली?
हे सर्व प्रकरण मागच्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी सुरू झाले. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटीकडून बोलत असल्याचा बोगस फोन विजय कुमारला आला होता. विजय कुमारच्या कागदपत्रांचा वापर अवैध जाहिराती आणि संदेश पसरविण्यासाठी झाला असल्याचे पलीकडून सांगण्यात आले. तसेच त्याच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले गेले. नरेश गोयल नामक इसमान विजय कुमारचे नाव वापरून सहा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे सांगण्यात आले. ही माहिती देणारा समोरील व्यक्ती पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले गेले.
या प्रकरणात विजय कुमार आणि त्याच्या कुटुंबियांची अटक होऊ शकते, असे सांगून विजय कुमारकडून ११.८३ कोटी रुपये उकळण्यात आले. तब्बल महिनाभर हा प्रकार सुरू होता. या काळात विजय कुमारची ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. त्याचा खटला सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चालविण्यात आल्याचे भासविले गेले.
१२ डिसेंबर २०२४ रोजी विजय कुमारने नजीकचे पोलीस ठाणे गाठले आणि महिन्याभरापासून सुरू असलेला अत्याचार कथन केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्याला डिजिटल अरेस्ट नामक घोटाळ्यात फसवले गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
केवायसी कागदपत्रावरून लावला छडा
बंगळुरू पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास करत ७.५ कोटी रुपये परत मिळविले आहेत. पोलिसांनी धवल भाई शाहला अटक केली. पण सोन्याच्या विटा घेण्याच्या बदल्यात विजय कुमारने सदर पैसे पाठविल्याचा बनाव त्याने केला. विजय कुमारने जे कागदपत्र चोरट्यांना दिले होते, त्याचाच वापर करत सोन्याच्या विटा विकत घेण्याचा व्यवहार झाला होता. मात्र यावेळी यावर दिलेला फोन नंबर वेगळा होता.
या नंबरचा तपास करत असताना पोलिसांना आढळले की, हा नंबर काही काळ गुजरातमध्ये सुरू होता. विजय कुमारच्या नावाने सायबर चोरट्यांनी धवल शाहशी संपर्क साधला आणि सोन्याच्या विटा खरेदी केल्या. या नंबरचा माग काढल्यानंतर पोलिसांनी करणला बेड्या ठोकल्या. करणचे दुबईत दुकान असून तो गुजरातमध्ये राहतो. त्याने तिसरा आरोपी तरुण नतानीकडून अनेक सीम कार्ड विकत घेतल्याचेही समोर आले. तरुण नतानीचे दिल्लीत मोबाइल शॉप आहे.
करण हा तरुणकडून सीम कार्ड खरेदी करायचा आणि ते दुबईला पाठवायचा. तिथून व्हॉट्सअॅप कॉलद्वारे डिजिटल अरेस्टची फसवणूक केली जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.