Digital Arrest Scam : ‘डिजीटल अरेस्ट’ ही फसवणुकीची पद्धत गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. प्रशासनाकडून याच्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नदेखील केले जात आहेत. यादरम्यान गुजरातमधील एका ९० वर्षीय वृद्धाने आयुष्यभर कष्ट करून जमवलेले १ कोटी रूपये ‘डिजीटल अरेस्ट’ फसवणुकीच्या माध्यमातून लुबाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने आपण सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव केला होता. इतकेच नाही तर संबंधीत वृद्धाला १५ दिवस ‘डिजीटल अरेस्ट’ करण्यात आले होते. फसवणूक करणाऱ्यांकडून सुरुवातीला तुमच्या नावाने मुंबईहून चीनला पाठवलेल्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ आढळल्याचे या वृद्ध व्यक्तीला सांगण्यात आले.
गुजरात गु्न्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ५ जणांना अटक करत चीनमधील टोळीच्या मदतीने चालवल्या जाणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मात्र यामागील सूत्रधार अद्याप सापडलेला नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी पार्थ गोपानी हा कंबोडियात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिस उपायुक्त (डीसीपी) भावेश रोझिया यांनी सांगितले की, शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या जेष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅपवर एका आरोपीचा कॉल आला होता. त्याने आपण सीबीआय अधिकारी असल्याचा दावा केला. तसेच तुमच्या नावाने मुंबईहून चीनला पाठवण्यात आलेल्या कुरिअरमध्ये ४०० ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडल्याचेही ज्येष्ठ नागरिकाला सांगण्यात आले. याबरोबरच बँक खात्याच्या तपशीलानुसार तुम्ही मनी लॉन्ड्रिंगमध्ये गुंतले असल्याचा दावादेखील फसवणूक करणार्याने वृद्ध व्यक्तीकडे केला. याबरोबरच या प्रकरणी गुन्हा दाखल करून तुम्हाला व कुटुंबियांना अटक करू, अशी भीती देखील दाखवण्यात आली.
रोझिया यांनी सांगितले की, चौकशीच्या बहाण्याने त्या वृद्ध व्यक्तीला आरोपींनी १५ दिवसांसाठी ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले आणि त्याच्या बँक खात्यातून केलेल्या व्यवहारांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर, आरोपींनी त्या वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून १,१५,००,००० रुपये ट्रान्सफर केले.
हेही वाचा>> “शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी, भाजपाचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, मीडियासमोर वक्तव्य करून…”
या घटनेची माहिती मिळताच पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांनी सुरत सायबर सेलशी संपर्क केला आणि २० ऑक्टोबर रोजी या प्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर ५ जणांना अटक करण्यात आली असून सुत्रधार गोपानी याचा शोध सुरू आहे. गोपानी याचे रेखाचित्रही पोलीसांनी प्रसिद्ध केले आहे.
पोलीसांनी सांगितले की, त्यांनी अटक केलेल्या आरोपींकडून वेगवेगळ्या बँकांचे ४६ डेबिट कार्ड, २३ बँक चेक बुक, एक वाहन, वेगवेगळ्या कंपन्यांचे चार रबरी शिक्के, नऊ मोबाइल फोन आणि २८ सीम कार्ड जप्त केले आहेत. रमेश सुराणा, उमेश जिंजाला, नरेश सुराणा, राजेश देवरा आणि गौरंग राखोलिया अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.