काळानुसार बदल स्वीकारत तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. देशाचा कायापालट करण्याची ताकद तंत्रज्ञानात असून ‘डिजिटल इंडिया’मुळे देशाला नवी दिशा मिळेल, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या प्रतिष्ठेच्या अशा ‘डिजिटल इंडिया वीक’ उपक्रमाचे उदघाटन करतेवेळी व्यक्त केला.
‘डिजिटल इंडिया’च्या अंतर्गत देशातील गावागावात इंटरनेट पोहोचविण्याचा मानस असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. ‘डिजिटल इंडिया’मुळे साडेचार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुक होणार असून यामधून १८ लाख नवे रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
‘मेक इन इंडिया’प्रमाणे ‘डिझाईन इंडिया’ देखील महत्त्वाचे असल्याचे सांगत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी देश स्वयंपूर्ण झाला पाहिजे, असे मोदी म्हणाले. यापुढे बँकांचा व्यवहार पेपरलेस करण्यात, प्रत्येक व्यक्तीपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यात आणि संपूर्ण सरकार मोबाईलवर येण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’ महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे मोदींनी सांगितले. ‘डिजिटल इंडिया वीक’च्या घोषणेसोबतच मोदींनी यावेळी सायबर सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित केला. सायबर सुरक्षेचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असून यासाठी भारतीय तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत. सायबर सेक्युरिटीमध्ये भारताने जगाचे नेतृत्त्व करावे अशी इच्छा असल्याचेही मोदी म्हणाले.
सरकारी कामांसाठी अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळ ऑनलाईन ठरविता येणार!
दरम्यान, डिजिटल इंडिया वीकच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची योजना सरकारने आखली आहे. या उपक्रमाच्या प्रत्येक दिवशी नवीन सेवा कार्यान्वित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच मोक्याच्या सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना यामध्ये सहभागी करुन देण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाच्या www.digitalindia.gov.in या संकेतस्थळाचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन देखील करण्यात आले. संकेतस्थळावर या उपक्रमाशी संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा