छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : ‘अनुवादक दोन भाषा आणि संस्कृतीच्या देवाण-घेवाणीचे काम करणारे दूत आहेत. त्यामुळे अनुवादक दुय्यम नाही, तर अनुसर्जनाची निर्मिती करणारा स्वतंत्र लेखक आहे,’ असा सूर ‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठी भाषेत’ या विषयावरील परिसंवादात रविवारी मान्यवरांनी व्यक्त केला.
प्रफुल्ल शिलेदार, पृथ्वीराज तौर, सुनीता डागा, दीपक बोरगावे, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचा यात सहभाग होता.
● ‘साहित्यकृतीचा अनुवाद करताना शब्दांची योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरते. भाषांतरात क्लिष्टता न आणता वाचकांना समजेल अशा पद्धतीने अनुवाद होणे आवश्यक आहे. उत्तम अनुवादित साहित्य जगभरात पोहोचण्यासाठी या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. प्रत्येक राज्याची भाषा आपले वैशिष्ट्य जपत असते. त्यातून उत्तम साहित्यकृतींची निर्मिती होते. त्यामुळे विपुल प्रमाणात अनुवादित साहित्य निर्माण करण्यासाठी त्या त्या भाषेतील साहित्यकृतींची उपलब्धता असणे आवश्यक आहे. उत्तम अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणात वाचले जाते, त्यातूनच ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते,’ असे नाईक म्हणाले.
● ‘अनुवाद ही संस्कृती संक्रमणाची बाब आहे. अनुवाद करताना दोन भाषांवर प्रभुत्व तर हवेच. पण, दोन्ही संस्कृतींची जाण असायला हवी. अनुवाद होत आहेत. त्यांना वाचकांनी पाठबळ द्यायला हवे,’ असे मत बोरगावे यांनी व्यक्त केले.
● डागा म्हणाल्या, ‘साहित्यकृती विश्वव्यापी होण्यात अनुवादित साहित्याचा मोठा वाटा आहे. अनुवादकाला भाषेची जाण असणे आवश्यक आहे. अनुवादाच्या प्रक्रियेत लेखक आणि अनुवादक यांच्यामध्ये सतत चर्चा सुरू राहिली पाहिजे. अनुवादक आधी वाचक आणि नंतर लेखक असतो. त्यामुळे अनुवाद हे नवसर्जन असते.’
● ‘अनुवाद भाषेला ज्ञानभाषा करण्याचे महत्त्वाचे काम करतो. मराठी भाषेत अनुवादाची परंपरा दीर्घ असून, त्यात विविध शैली आहेत. अनुवादामुळे भाषाज्ञान समृद्ध होते,’ असे तौर यांनी सांगितले.
● शिलेदार म्हणाले, ‘अनुवादाच्या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. अनुवादित साहित्यासंदर्भात शासकीय स्तरावरही स्वतंत्र मंडळ आणि समिती असायला हवी.अनुवाद वस्तुनिष्ठ नव्हे, तर व्यक्तिनिष्ठ असल्याने एका कथेचे किंवा कवितेचे अनेक अनुवाद होऊ शकतात.’