काँग्रेसचे मध्यप्रदेशातील नेते दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवर त्यांचे एका महिला पत्रकाराशी संबंध असल्याचे सांगून तिच्याशी विवाह करणार असल्याची घोषणा केली. त्यांचा हा ट्विट सोशल मीडियात व्हायरल ठरला आहे, म्हणजेच ती बातमी वेगाने पसरत आहे.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमृता राय हिच्याशी आपले संबंध आहेत. ती व तिच्या पतीने घटस्फोट घेतला आहे. घटस्फोट पूर्ण झाल्यावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. असे असले तरी व्यक्तिगत आयुष्यात होत असलेल्या हस्तक्षेपाचा आपण निषेध करतो. दिग्विजय सिंग यांच्या पत्नी आशा यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला आहे. त्यांना चार मुली व मुलगा आहे. राय ही पत्रकार महिला चाळिशीतील असून तिनेही आपण सिंग यांच्याशी विवाह करू, त्यासाठी आधी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे ट्विट केले आहे. आपण पतीपासून वेगळे झालो असून आपसमजुतीने घटस्फोट घेत आहोत. त्यानंतर दिग्विजय सिंग यांच्याशी विवाह करणार आहोत, असे तिने म्हटले आहे. राय यांनी असा आरोप केला की, आपले इमेल खाते व संगणक हॅक करण्यात आला. त्यातील मजकूर चोरण्यात आला. भारतात हा व्यक्तिगततेवर आक्रमणाचा गुन्हा आहे, त्याचा आपण निषेध करतो असे राय यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस शकील यांनी सांगितले की, त्यांच्या या प्रकरणाची आपल्याला काही माहिती नाही.
भाजपने मात्र या प्रकरणाचा फायदा घेत नीतिमत्ता व कायदेशीरता हे मुद्दे उपस्थित करीत काँग्रेस नेतृत्वाने याची दखल घ्यावी असे म्हटले आहे.

Story img Loader