काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपाने काँग्रेस आमदाराला 100 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. मध्य प्रदेशातील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. भाजपाने दिग्विजय सिंह यांचा आरोप फेटाळून लावला आहे. दिग्विजय सिंह यांनी केलेले आरोप चुकीचे असून ते सिद्ध करुन दाखवावेत असं आव्हान भाजपाने दिलं आहे.
‘भाजपा आमदार नारायण त्रिपाठी यांनी काँग्रेस आमदार बजीनाथ कुशवाहा यांच्याशी संपर्क साधत त्यांना आपल्यासोबत एका ढाब्यावर नेलं. तिथे भाजपाचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा आणि विश्वास नारंग यांनी कुशवाहा यांची भेट घेतली. सरकारमधून बाहेर पडण्यासाठी कुशवाहा यांना 100 कोटींची ऑफर देण्यात आली. त्यांना भाजपा सरकारमध्ये मंत्रीपदाचीदेखील ऑफर देण्यात आली’, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी भाजपाने काँग्रेसच्या अनेक आमदारांना अशा पद्धतीच्या ऑफर दिल्या असल्याचं सांगितलं. ‘भाजपा नेत्यांनी कुशवाहा यांना चार्टर्ड विमान तयार असून आपल्यासोबत येण्यास सांगितलं. पण त्यांनी सोबत जाण्यास नकार दिला’, असं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं आहे.
शिवराज सिंह चौहान आपला पराभव पचवू शकत नाही आहेत असा टोला यावेळी दिग्विजय सिंह यांनी लगावला. भाजपा नेत्यांनी दिग्विजय सिंह यांचे आरोप फेटाळून लावले असून गेल्या अनेक काळापासून प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते असे आरोप करत असल्याचं म्हटलं आहे. जर त्यांच्याकडे पुरावा असेल तर कायदेशीर कारवाई करावी असं भाजपाने म्हटलं आहे.