भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज, बुधवारी येथे होत असलेल्या ‘कार्यकर्ता महाकुंभ’ मेळाव्यात दहा हजार बुरखे वाटण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. मात्र, या बुरख्यांचे बिल एका बांधकाम कंपनीने अदा केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
भाजपचा आज, बुधवारी भोपाळमध्ये ‘कार्यकर्ता महाकुंभ’ मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी दहा हजार बुरखे शिवण्यात आले असून त्याचे ४४ लाखांचे बिल मात्र एका बांधकाम कंपनीने अदा केल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केला आहे. मात्र, भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे. भोपाळच्या मेळाव्यासाठी भाजपतर्फे जय्यत तयारी सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर दिग्विजय यांनी वरील आरोप केला आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी भोपाळमधीलच एका शिंप्याला दहा हजार बुरखे शिवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या बुरख्यांच्या शिलाईचे एकंदर ४४ लाखांचे बिल एका बांधकाम कंपनीच्या मालकाने भोपाळमध्ये येऊन संबंधित शिंप्याला अदा केले. हा आरोप करताना मध्य प्रदेश काँग्रेसने या बिलाची पावतीही सादर केली. मात्र, भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे. दिग्विजयसिंह हे कोणत्याही थराला जाऊन आरोप करणारे नेते आहेत. भाजपने गेल्या दहा वर्षांत मध्य प्रदेशात केलेली प्रगती पाहून त्यांना पुन्हा सत्ता मिळणे दुरापास्त वाटत आहे त्यामुळेच आलेल्या नैराश्यातून हे असे आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर मध्य प्रदेश भाजपचे प्रवक्ता दीपक विजयवर्गिया यांनी दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा