बोलघेवडय़ा नेत्यांमुळे पक्ष अधिक अडचणीत येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने मंगळवारी पक्षाची बाजू ठोसपणे मांडण्यासाठी तब्बल ७२ नेत्यांची टीम जाहीर केली. पाच वरिष्ठ प्रवक्ते, १३ प्रवक्ते, प्रसारमाध्यमांत बोलण्यासाठी ५४ प्रतिनिधी असे हे जंबो प्रवक्ता ‘मंडळ’ आहे. मात्र वेळोवेळी वादग्रस्त विधाने करणारे दिग्विजय सिंह यांना प्रवक्तापदावरून डच्चू देण्यात आला आहे.
वरिष्ठ प्रवक्त्यांमध्ये केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, अर्थमंत्री पी. चिदंबरम, आनंद शर्मा, सलमान खुर्शीद व मुकुल वासनिक यांचा समावेश आहे. ज्योतिरादित्य शिंदे, पी. सी. चाको, राज बब्बर, सत्यव्रत चतुर्वेदी, रणदीप सुर्जेवाला, रिटा बहुगुणा जोशी, शशी थरूर, संदीप दीक्षित, शकील अहमद आदींना प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सेक्स सीडी प्रकरणावरून अडगळीत पडलेल्या अभिषेक मनू सिंघवी यांनादेखील प्रवक्त्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
वृत्तवाहिन्यांवर चर्चेत सहभागी होण्यासाठी नेमण्यात आलेल्या २४ जणांमध्ये महाराष्ट्रातून अनंत गाडगीळ, राज्यसभा सदस्य भालचंद्र मुणगेकर, राजीव शुक्ला व संजय निरुपम यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याशी संबंधित विषयावर पक्षाचे मत मांडण्यासाठी स्वतंत्रपणे ३० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader