नरेंद्र मोदी, भाजप, रा. स्व. संघ यांच्याकडून होणारी विधाने किंवा कोणतीही कृती याला ट्विटरच्या माध्यमातून तात्काळ हजरजबाबीने प्रत्युत्तर देणारे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग उर्फ दिग्गीराजा यांनी मध्य प्रदेशच्या राजकारणापासून काहीशी फारकत घेतली आहे. ‘मावळत्या नव्हे तर उगवत्या सूर्याला साष्टांग नमस्कार घालण्याची आपली संस्कृती आहे’, असे सांगत दहा वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या दिग्गीराजांनी आपण स्वत:च राज्याच्या राजकारणापासून काहीसे दूर होत असल्याचे सूचित केले आहे.
दिग्विजय सिंग यांनी १९९३ ते २००३ अशी दहा वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले. २००३ मध्ये राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आणि पुढील दहा वर्षे आपण कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. दिलेल्या शब्दावर ते ठाम राहिले. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली असतानाच दिग्विजय सिंग यांनी काहीसे दूर राहणे याची पक्षातही चर्चा सुरू झाली. अलीकडेच ग्वाल्हेरमध्ये झालेल्या राहुल गांधी यांच्या जाहीर सभेतही दिग्विजय सिंग चक्क दुसऱ्या रांगेत बसले होते. राहुल गांधी यांच्याबरोबरीने कमलनाथ आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ज्योतिरादित्य िशदे हे होते.
मध्य प्रदेश या आपल्या कर्मभूमीत दिग्गीराजांनी फारसे सक्रिय न होण्याचे कारण काय असावे ही चर्चा साहजिकच राजकीय वर्तुळात आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणला आहे. वास्तविक शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यास विलंबच झाला होता, अशी काँग्रेसमध्ये प्रतिक्रिया आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे प्रचार समितीचे सूत्रे सोपविल्यापासून दिग्गीराजा राज्याच्या राजकारणापासून थोडेसे दूर गेले. त्यातूनच त्यांनी ‘उगवत्या सूर्याला साष्टांग’ घालतात अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यातच मध्य प्रदेशमध्ये सत्ता मिळणे काँग्रेससाठी सोपे नाही. जनमत चाचण्यांचे सारेच अंदाज भाजपला अनुकूल आहेत. यशाचे धनी व्हायला सर्वांनाच आवडते पण पराभवाची जबाबदारी कोणीच घेण्यास तयार होत नाही. ही सारी पाश्र्वभूमी लक्षात घेता दिग्विजय सिंग यांनी थोडे दूर राहणेच पसंत केले असावे. आपले पुत्र जयवर्धन सिंग यांना आपल्या पारंपारिक बालेकिल्ल्यातून निवडून आणण्याचा सिंग यांचा प्रयत्न आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा