नेहरू-गांधी परिवारातील नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा घाट केंद्रातील भाजप सरकारने घातला आहे. त्याचसाठी वादग्रस्त ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात ओढून ताणून गांधी परिवारातील नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला.
गेल्या दोन वर्षांत ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात केंद्र सरकारला ठोसपणे काहीही करता आलेले नाही. त्यामुळेच आता फक्त हा मुद्दा उपस्थित करून गांधी परिवारातील नेत्यांवर चिखलफेक करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचे उघड झाल्यावरच तत्कालिन यूपीए सरकारने तातडीने करार रद्द करून इटलीच्या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते, असे दिग्विजय सिंह म्हणाले.
इटलीमधील न्यायालयात नेहरू-गांधी परिवारातील कोणत्याही नेत्यावर कसलेही आरोप ठेवण्यात आलेले नाहीत. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सुद्धा तेथील न्यायालयाने स्पष्टपणे कोणाचेही नाव घेतले नसल्याचे सांगितले आहे. पण तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नेहरू-गांधी परिवारातील नेत्यांची नावे या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

Story img Loader