राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राज्यसभेचे खासदार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी बुधवारी एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलेलं भाषण सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे एका सभेसमोर त्यांनी आपल्या भाषणामध्ये आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं.

नेहमी संघ आणि भाजपावर टीका करणाऱ्यचा सिंह यांच्या तोंडून विरोधी विचारसणीच्या संस्थेचं आणि व्यक्तीचं कौतुक ऐकताना अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राजधानीचं शहर असणाऱ्या भोपाळमध्ये नमर्दा परिक्रमेवर आधारित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमामध्ये बोलताना सिंह यांनी आरएसएस आणि शाह यांचं कौतुक केलं. आपल्या नर्मदा परिक्रमेच्या दौऱ्यादरम्यान संघ आणि भाजपाने दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांनी हे कौतुक केल्याचं वृत्त न्यूज १८ नं दिलं आहे.

या कार्यक्रमामध्ये दिग्विजय सिंह यांनी आपल्या नर्मदा परिक्रमा यात्रेदरम्यानेच अनुभव सांगितले. त्यावेळी त्यांनी त्यांची यात्रा गुजरातमधून जात होती तेव्हा अमित शाह यांनी वन अधिकाऱ्यांना सूचना करत शासकीय विश्रामगृहामध्ये आमच्या राहण्याची सोय केली होती, अशी आठवण सांगितली. दिग्विजय सिंह यांनी आपण अमित शाह यांचे सर्वात मोठे टिकाकार आहोत, असंही सांगितलं. असं असतानाही त्यांनी वन अधिकाऱ्यांशी बोलून माझ्या यात्रेमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये यासंदर्भातील काळजी घेतली. मी कधी शाह यांना समोरासमोर भेटलेलो नाही. मात्र मी यासाठी अमित शाह यांना धन्यवादचा संदेश नक्कीच पाठवलेला. राजकीय सामंजस्य कसं असावं याचं हे उदाहरण आहे. अनेकदा आपल्यापैकी अनेकांना याचा विसर पडतो, असं दिग्विजय सिंह म्हणाले.

माजी मुख्यमंत्री राहिलेल्या दिग्विजय सिंह यांनी संघाबद्दल बोलताना, संघ आणि माझे विचार सारखे नाहीत. मात्र या यात्रेदरम्यान संघाचे लोक मला भेटायला येत होते. संघाच्या कार्यकर्त्यांना माझी भेट घेण्यासंदर्भात वरुन आदेश दिले जातेय. त्यांच्याकडून माझ्या राहण्या खाण्याची व्यस्था केली जातीय. संघाचे लोक कष्ट करतात मात्र त्यांच्या देश वाटण्याच्या गोष्टींचं मी समर्थन करत नाही म्हणून आमचा वैचारिक विरोध कायम आहे, असं दिग्विजय सिंह म्हणाले.

Story img Loader