ऑगस्ट २०१९मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं राज्यघटनेचं कलम ३७० हटवलं. मात्र, त्यानंतर दीड वर्ष उलटूनही हा मुद्दा असूनही भाजपा-काँग्रेस आणि भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये वादाचा आणि म्हणूनच चर्चेचा विषय ठरला आहे. नुकतंच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी कलम ३७० संदर्भात केलेलं विधान सध्या चर्चेत आलं असून त्यावर सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाकडून जोरदार टीका केली जात आहे. क्लबहाऊस या अॅपमधील लाईव्ह चर्चेमध्ये एका पाकिस्तानी पत्रकाराशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी ते विधान केलं होतं. याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून भाजपाकडून आता दिग्विजय सिंह आणि काँग्रेस यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.
नेमका काय आह वाद?
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी Clubhouse या अॅप्लिकेशनवर एका चर्चेमध्ये सहभाग घेतला होता. या चर्चेमधली एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये, शाहजेब गिलानी नावाच्या जर्मनीमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी पत्रकारासोबत ते चर्चा करत होते. यावेळी कलम ३७० च्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना “काँग्रेस सत्तेत आल्यास कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा नक्कीच पुनर्विचार करू”, असं विधान दिग्विजय सिंह यांनी केलं होतं. भाजपाचे कर्नाटकमधील आमदार गिरीराज सिंह यांनी ही क्लबहाऊसमधली ही ऑडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. तसेच, यासोबतच “काँग्रेसचं पहिलं प्रेम पाकिस्तान आहे. दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींचा संदेश पाकिस्तानला दिला आहे. काश्मीर बळकावण्यात काँग्रेस पाकिस्तानला मदत करेल”, अशा शब्दात गिरीराज सिंह यांनी टीका केली आहे.
Congress’s first love is Pakistan.
Digvijay Singh conveyed Rahul Gandhi’s message to Pakistan.
Congress will help Pakistan in grabbing Kashmir. pic.twitter.com/eYl3cnzYo0
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) June 12, 2021
हीच काँग्रेसचीही भूमिका आहे का?
दरम्यान, क्लबहाऊसमधली ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील टीका केली आहे. “सोनिया गांधी आणि राहुल गांधी दिग्विजय सिंह यांच्या क्लबहाऊसबद्दल काय मत आहे? हीच काँग्रेसचीही भूमिका आहे? आम्ही मागणी करतो की राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण द्यावं”, असं संबित पात्रा म्हणाले आहेत. त्यापाठोपाठ भाजपाच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
What do Sonia Gandhi and Rahul Gandhi think about Digvijaya’s Clubhouse statement? Is this Congress’ stand too? We demand Rahul Gandhi to hold a press conference and clarify: BJP leader Sambit Patra pic.twitter.com/Ie0ae6XiVU
— ANI (@ANI) June 12, 2021
वाद झाल्यावर दिग्विजय म्हणतात…!
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपानं टीका सुरु केल्यावर दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यावर खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. “अनपढ लोगों की जमात को Shall और Consider में फर्क शायद समझ में नहीं आता”, असं ट्वीटर दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून टूलकिटप्रमाणेच नवा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
अनपढ़ लोगों की जमात को
Shall और Consider में फ़र्क़
शायद समझ में नहीं आता।— digvijaya singh (@digvijaya_28) June 12, 2021
क्लबहाऊस म्हणजे काय?
सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास क्लबहाऊस म्हणजे ऑनलाईन चर्चासत्र. यामध्ये वक्त्यांना आपली भूमिक मांडण्याची सुविधा असते, तर ती ऐकण्यासाठी श्रोते म्हणून सहभागी होण्याचीही सुविधा असते. वेगवेगळ्या ठिकाणी असलेले लोक ऑनलाईन स्वरुपात यामध्ये सहभागी होऊ शकतात. हे व्हिडिओ कॉलसारखं माध्यम नसून यामध्ये फक्त ऑडिओ चर्चा होऊ शकते. सध्याच्या युजर्सकडून इन्व्हाईट आल्यानंतरच ते नवीन युजर्सला डाऊनलोड करता येतं.