काँग्रेसने केंद्रात केलेली दोन सत्ताकेंद्रांची व्यवस्था आदर्श स्वरूपाची असल्याचे पक्षाने स्पष्ट करूनही पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे यासंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यावर बुधवारी ठाम राहिले.
काँग्रेसने केलेला दोन सत्ताकेंद्रांचा प्रयोग फसला आहे, असे आपले मत कायम आहे. मात्र, पक्षाची भूमिका आपल्यासाठी सर्वोच्च असल्याने आपण तिच्याशी बांधील आहोत, असे स्पष्टीकरण दिग्विजय यांनी केले. पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद देणारी वक्तव्ये करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आपल्या ताज्या वक्तव्याबद्दल त्यांनी सांगितले, ‘‘मी जे काही म्हणालो त्याची नोंद झाली आहे. माझे वक्तव्य मी बदलणार नाही. मात्र, पक्षाचे प्रवक्ते जर्नादन द्विवेदी यांनी मंगळवारी मांडलेली मते मला मान्य आहेत.’’द्विवेदी यांनी दिग्विजय यांची दोन सत्ताकेंद्रांबाबतची मते फेटाळली होती. ‘‘काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यातील नाते अभूतपूर्व असे आहे. कोणत्याही लोकशाहीसाठी ते आदर्श ठरू शकते. पक्षाने केलेली ही व्यवस्था भविष्यातदेखील चालू शकते,’’ असे द्विवेदी मंगळवारी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारीबाबत पक्षापुढे पर्याय खुले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. 

Story img Loader