काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांना मंगळवारी मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेच्या पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव केला. ही सुविधा ‘उपऱ्यां’साठी उपलब्ध नाही, असे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.
सभागृहातील अभ्यागतांच्या कक्षात बसून काही वेळ कामकाज पाहिल्यानंतर दिग्विजयसिंह यांची ‘व्यापम’ घोटाळ्यावर पत्रकार परिषद घेण्याची इच्छा होती. त्यासाठी ते पत्रकार कक्षाजवळ आले असता, मार्शलने त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष डॉ. सीताशरण शर्मा यांचा आदेश दिला.
विधानसभेच्या अध्यक्षांनी प्रधान सचिव भगवानदेव इसरानी यांच्यामार्फत आदेश जारी केला. विधानसभेच्या संकुलात उपऱ्यांना पत्रकार परिषद घेण्याची परवानगी देता येणार नाही, असे त्या आदेशात म्हटले होते.
केवळ मंत्री आणि सभागृहाचे सदस्य यांनाच तशी परवानगी आहे, असेही आदेशात म्हटले होते.हा आदेश प्राप्त होताच दिग्विजयसिंह हे पत्रकार कक्षाजवळ गेले आणि त्यानंतर त्यांनी विधानसभा संकुलाबाहेर जाऊन ‘व्यापम’ घोटाळ्यावर पत्रकार परिषद घेतली. आपण पाच वेळा विधानसभेचे सदस्य होतो आणि दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होतो, तरीही ते आपल्याला उपरे कसे म्हणतात, असेही दिग्विजयसिंह म्हणाले.

Story img Loader