आपल्या वाणीमुळे चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांनी सोमवारी चक्क सर्वोच्च न्यायालयावरच ताशेरे ओढले. सीबीआयला पिंजऱयातील बंद पोपटाची उपमा देऊन आपण आपल्या संस्थांचे महत्त्व कमी करत नाही का, असा प्रश्न मला सर्वसामान्य जनतेला विचारायचा असल्याचे वक्तव्य दिग्विजयसिंह यांनी केले.
सर्वसामान्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीच पाहिजे. देशातील संस्थांना जे कोणी पोपटाची किंवा चिकनची उपमा देते आहे. त्यांच्याकडूनही तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहिजेत, असे दिग्विजयसिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, सिंह यांच्या या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाने खरपूस समाचार घेतला. दिग्विजयसिंह यांनी न्यायालयावर टीका करण्याआधी यूपीए सरकारच्या कार्यकाळात एवढे घोटाळे का झाले, याची माहिती जाणून घ्यावी, असे भाजपने म्हटले आहे.
कोळसा घोटाळ्याप्रकरणी तपासाचा स्थितीदर्शक अहवाल कायदामंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाला दाखविल्याचे प्रतिज्ञापत्र सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने सीबीआयसह केंद्र सरकारवर टीका केली होती. सीबीआयची अवस्था बंद पिंजऱयातील पोपटाप्रमाणे झाली असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले होते. न्यायालयाच्या याच मतानंतर कायदामंत्री अश्वनीकुमार यांनी राजीनामा दिला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा