भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मार्केटिंगमध्ये अतिशय चतुर असून, ते नरेंद्र मोदींना उत्पादित वस्तू म्हणून प्रत्येकी पाच रुपयांत विकत असल्याची टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी गुरुवारी केली.
हैदराबादमध्ये पुढील महिन्यात मोदींची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी आंध्र प्रदेश भाजपतर्फे नोंदणी शुल्क म्हणून प्रत्येकाकडून पाच रुपये घेण्यात येत आहेत. भाजपच्या या निर्णयावर दिग्विजयसिंह यांनी प्रहार केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मार्केटिंग करण्यात चतुर आहेत. ते मोदींना एक उप्तादित वस्तू म्हणून प्रत्येकी पाच रुपयांत विकताहेत. आश्चर्यकारकच आहे. त्यांच्या मार्केटिंगमधील चतुरपणाला मानले पाहिजे, असे त्यांनी ट्विटरवर ट्विट केले आहे.
भाजपने मोदींच्या सभेसाठी नोंदणी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यास सुरुवात केलीये. भाजप लोकशाहीच्या माध्यमातून पैसे उभारण्याचे काम करीत असल्याचे कॉंग्रेसने याअगोदरच म्हटले आहे.

Story img Loader