काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शुक्रवारी सायंकाळी करण्यात आलेल्या हल्ल्याचे खापर सिंग यांनी भाजपवर फोडले आहे. राज्यात वर्षअखेरीस निवडणुका होत असून काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यामुळे सत्तारूढ भाजपला नैराश्याने ग्रासले आहे, असेही सिंग यांनी म्हटले आहे.
धार जिल्ह्यातील कुकशी येथे सिंग यांच्या वाहनावर शुक्रवारी सांयकाळी दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात वाहनाचे नुकसान झाले. मात्र सिंग आणि राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजय सिंग यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्यांना जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून सत्तारूढ भाजपला नैराश्याने ग्रासले आहे, असे दिग्विजय सिंग यांनी वार्ताहरांना सांगितले. तथापि, भाजपने या हल्ल्यात हात असल्याच्या वृत्ताचे जोरदार खंडन केले आहे.
झाबुआ जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यांना जनतेने तुफान गर्दी केली होती आणि त्यामुळेच सत्तारूढ भाजप बिथरला. आपल्या वाहनावर हल्ला करणाऱ्यांनी भाजप झिंदाबादच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी हल्लेखोरांना पकडून शासन करावे, अशी मागणी दिग्विजय सिंग यांनी केली.

Story img Loader