काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. विकासाच्या मुद्दय़ावर मोदी दिशाभूल करत असून, वाघाला आपल्या अंगावरचे ठिपके कधी पुसता येतात काय असा सवाल दिग्विजय सिंह यांनी करत मोदींना चर्चेसाठी आव्हान दिले आहे.
सुशासन आणि विकासाच्या मुद्दय़ावर मोदींनी कोणत्याही काँग्रेस नेत्याशी चर्चा करावी. मोदी र्सवकष विकासाची चर्चा करतात हेच मुळी स्वागतार्ह आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळातील विकासाचे फसवे आकडे मोदी सांगत आहेत असे दिग्विजय यांनी ट्विटरवर म्हटले आहे. फेकू असा मोदींचा उल्लेख करत ते विकासाच्या दाव्यांबाबत दिशाभूल करत असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला.
मोदी यांनी अनिवासी भारतीयांना व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केल्यानंतर दिग्विजय यांनी मोदींच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. काँग्रेस लोकांना अधिकार देते मोदी मात्र स्वत:च्या पलीकडे पाहात नाही, अशी कोपरखळी लगावली. मोदींना काँग्रेसमुक्त भारत हवा आहे तर काँग्रेसला भुक मुक्त भारत हवा असल्याचा टोलाही लगावला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केल्याचा दावा दिग्विजय यांनी केला. माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा, मनरेगा अशी अनेक योजना सरकारने राबवल्याचे दिग्विजय सिंह यांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर मोदी काँग्रेसवर टीका करत आहेत. मात्र त्यांचे माजी अध्यक्ष पैसे घेताना पकडले गेले याची आठवण दिग्विजय सिंह यांनी करून दिली.