केंद्रातील मोदी सरकारला शनिवारी चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रम राबवून सरकारच्या कामगिरीबद्दल जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरीकडे केंद्र सरकार कसे अपयशी ठरले हे सांगण्यात काँग्रेसनही पुरेपूर प्रयत्न केला. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर टीका करत भ्रष्टाचारावर या सरकारने काहीच काम केले नसल्याची टीका केली आहे. काळ्या पैशांबाबत देशातील ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यात खुली चर्चा व्हावी असे आव्हान त्यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना दिले आहे. भ्रष्टाचारावर मोठमोठे दावे करणाऱ्या भाजपा सरकारने गुजरातमध्ये अजूनही लोकायुक्त नेमलेला नाही. चार वर्षांत लोकपालही नियुक्त केलेला नाही. सांप्रदायिकता वाढवणे आणि हिंदू-मुसलमानांच्या नावावर हिंदूना मत मागणे, हा भाजपाचा एकमेव अजेंडा असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिग्विजय सिंह यानी प्रकाश जावडेकर यांना आव्हान देत म्हटले की, काळ्या पैशांवर जेटली आणि जेठमलानी यांच्यात खुली चर्चा करा. तिथेच सत्य बाहेर येईल. भाजपाने म्हटले होते की, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५-१५ लाख रूपये जमा होतील. हे पैसे कुठे गेले, असा सवाल करत सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकास्त्र सोडले. दहशतवाद्यांची पाळेमुळे नष्ट होतील, काळा पैसा संपुष्टात येईल, बनावट नोटा राहणार नाहीत, असे मोदी म्हणत होते. पण मोदींनी काहीच तयारी केली नाही. उलट यामुळे १५ लाख लोकांचा रोजगार गेला. जीडीपी खाली गेला. त्याचबरोबर बँकांमध्येही भ्रष्टाचार झाला.

दरम्यान, सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कटक येथे आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. जेव्हा सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराबाबत कडक पावले उ़चलली तर कट्टर शत्रूही एक झाले. जनता विरोधी पक्षांच्या नेत्यांना पाहत आहे, असा आरोप करत हे सरकार जनपथवरून नव्हे तर जनमताने चालते असा टोला काँग्रेसला लगावला.

Story img Loader