नक्षलवाद्यांनी आपला हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा आणि काँग्रेस पक्षात यावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केले आहे. नेपाळमधील माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येणे पसंत केले. भारतातील नक्षलवाद्यांनीही हाच मार्ग अनुसरण्याची गरज आहे. जर त्यांना राजकीय प्रवेशासाठी काँग्रेस हा पक्ष योग्य वाटत असेल, तर त्यांनी या पक्षात यावे, असे सिंह यांनी म्हटले आहे.
पणजी येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या पाश्र्वभूमीवर सिंह यांनी ही भूमिका मांडली आहे. नक्षलवाद्यांनी लोकशाही मार्गाच्या मुख्य राजकीय प्रवाहात सामील होण्याची गरजच मी झारखंडमध्ये व्यक्त केली होती, त्यात गैर ते काय, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला. द्वेष, हिंसा आणि भाजपचे सांप्रदायिकतेवर आधारित राजकारण संपुष्टात आणायला मदत करावी, असे माझे मत मी तेव्हाही मांडले होते, असे सांगत झारखंड येथील आपल्या वक्तव्याचे त्यांनी समर्थन केले.

Story img Loader