दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेल्या काँग्रेसमधील वाद आता चव्हाटय़ावर आले आहेत. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दारुण पराभवाला पक्षाचे दिल्लीतील प्रचारप्रमुख अजय माकन यांना जबाबदार धरले आहे. मात्र काँग्रेसचे दिल्ली प्रभारी पी.सी. चाको व प्रदेशाध्यक्ष अरविंद लवली यांनी माकन यांची बाजू घेतली आहे.
केवळ आपणच सगळे निभावून नेऊ, अशा थाटात माकन वावरले. प्रचाराच्या रणनीतीत त्यांनी कुणालाही सामील करून घेतले नाही. त्यांच्या या कार्यपद्धतीने काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे खापर दीक्षित यांनी माकन यांच्या माथी फोडले.
२०१३पर्यंत सलग १५ वर्षे दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. मात्र पक्षाने जी विकासकामे केली, ती जनतेपुढे आणण्यात माकन यांना अपयश आले. इतकेच नव्हे तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यातही त्यांना यश आले नसल्याचा आरोप दीक्षित यांनी केला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटून दिल्लीत पक्षाची नव्याने बांधणी कशी करता येईल, याची चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. पक्षाने जबाबदारी दिली तर धुराही सांभाळू, नेतृत्वानेच निर्णय घ्यायचा आहे, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.
दिल्ली काँग्रेसची संघटनात्मक बांधणीही व्यवस्थित नसल्याचा ठपका ठेवत, काँग्रेसची मते २४ टक्यांवरून ९ टक्क्यांवर येणे चिंतेची बाब आहे. पक्षाचा दुरावलेला पारंपरिक मतदार पुन्हा कसा जोडता येईल याचा विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दीक्षित म्हणाल्या की, माकन यांनी दिल्लीतील राजकीय परिस्थिती हाताळताना पक्षातील कोणालाही विश्वासात घेतले नाही.
काँग्रेसमधून नाराजी
शीला दीक्षित यांच्या वक्तव्यावर पी.सी.चाको यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माकन यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी पक्षाच्या यशासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रशस्तिपत्रही चाको यांनी दिले. दिल्लीत काँग्रेसच्या उभारीसाठी काय करता येईल, याबाबत पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बुधवारी चर्चाही झाली. शीला दीक्षित यांनी निवडणुकीपूर्वीच सूचना करायला हव्या होत्या, अशी अपेक्षा अरविंदसिंग लवली यांनी व्यक्त केली. त्या आमच्या नेत्या आहेत. त्यांच्याबाबत आम्हाला आदर आहे. मात्र माध्यमांकडे धाव घेण्यापेक्षा काँग्रेस महासमितीकडे जायला हवे होते, अशी अपेक्षा लवली यांनी व्यक्त केली. दिल्लीत शीला दीक्षित यांचे मतदारांवरील वर्चस्व कमी झाल्याने माकन यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती, असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
दिल्लीत मुजरा संपला, गोंधळ सुरू
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेल्या काँग्रेसमधील वाद आता चव्हाटय़ावर आले आहेत.
First published on: 13-02-2015 at 05:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dikshit chacko and maken lock horns after delhi poll rout sonia gandhi intervenes to douse fire