ज्या लघुग्रहामुळे पृथ्वीवरील डायनोसॉर्स नष्ट झाले, तो एकच लघुग्रह नव्हता तर एकमेकांभोवती फिरणारे दोन लघुग्रह होते. ६.५५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर झालेला हा आघात त्यामुळेच दुहेरी स्वरूपाचा होता. डायनोसॉर ज्या लघुग्रहामुळे नष्ट झाले तो ७ ते १० किलोमीटर व्यासाचा एकच भलमोठा दगड होता असे आतापर्यंत मानले जात होते पण ते दोन दगड होते व त्यांचा मिळून व्यास तेवढा होता असे संशोधकांचे म्हणणे आहे.
दोन आघातांनी तयार झालेल्या पृथ्वीवरील या विवरांचा फेरअभ्यास करण्यात आला. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आगामी काळात अशा आघातांपासून संरक्षण करण्यासाठी योजना आखणाऱ्यांसाठी ही वाईट बातमी आहे कारण असे अनेक आघात एकावेळी होत असतील, तर तर ते रोखणे सोपे नाही असे ‘न्यू सायंटिस्ट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे. कॅनडातील हडसन बे येथे क्लीअरवॉटर लेक आहे, तिथे या दुहेरी आघाताच्या खुणा दिसतात. ती दोन विवरे आहेत. असे असले तरी क्लीअरवॉटरसारखी उदाहरणे तुलनेने कमी आहेत. पृथ्वीवरील पन्नास विवरांपैकी एक अशा प्रकारच्या दुहेरी विवरांच्या स्वरूपात आहे. पॅरिसमधील ‘द इन्स्टिटय़ूट ऑफ अर्थ फिजिक्स’ या संस्थेच्या कॅटरिना मिलजोविक यांनी सांगितले की, पृथ्वीभोवती फिरणारे पंधरा टक्के लघुग्रह हे द्वैती स्वरूपाचे आहेत. हे पंधरा वर्षांपासून आपल्याला ज्ञात आहे. पृथ्वीवरील १५ टक्के आघात हे दोन लघुग्रहांमुळे झालेले आहेत. मिलजोविक यांच्या मते विवरांचा हा आकडा कमी दिसण्याचे कारण म्हणजे लघुग्रह दोन असले तरी त्यामुळे पडणारा खड्डा म्हणजे विवर एकच होते. फार दुर्मिळ घटनांमध्ये दोन लघुग्रहांच्या आघाताने दोन विवरे तयार झालेली दिसतात. हे द्वैती लघुग्रह फार दुर्मिळ असतात व त्यामुळे पृथ्वीवरील दोन टक्केच विवरे ही जोडीच्या रूपात दिसतात असे त्यांचे मत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा