पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचा भंग होत आहे आणि त्यांना तसे करण्यापासून रोखण्याकामी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासंदर्भात वारंवार सांगूनही सरकार त्याकडे लक्ष देत नाही. अशा वातावरणात पाकिस्तानशी चर्चा करण्याची घाई सरकारने करू नये, असे आवाहन भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे केले.
पंतप्रधान मनमोहन सिंग या महिन्यात न्यूयॉर्क येथे जात असून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफही त्याच सुमारास तेथे जात आहेत. तेथे उभयतांची भेट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा वेळी योग्य वातावरण नसेल तर त्यांच्यासमवेत चर्चा करण्याची काय घाई आहे, असे आपण पंतप्रधानांना विचारू इच्छितो, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्या वेळी या हल्ल्यात सहभागी असलेल्यांविरोधात पाकिस्तान जोपर्यंत कारवाई करीत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा होणार नाही, असे पंतप्रधान त्या वेळी म्हणाले होते, याची आठवण राजनाथ सिंह यांनी करून दिली.
पाकिस्तान ज्या पद्धतीने सध्या शस्त्रसंधीचा भंग करीत आहे, त्याचा सरकारकडून योग्य प्रतिवाद केला जात नाही, असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. प्रत्येक वेळी युद्धाचाच पर्याय असतो असे नाही. परंतु पाकिस्तानच्या या सातत्याने होणाऱ्या आगळिकीविरोधात राजनैतिक तसेच आंतरराष्ट्रीय दबाव आणणेही शक्य आहे, असे राजनाथ सिंह यांनी सुचविले.

Story img Loader