अमेरिका आणि नेटो युक्रेनसाठी रशियाविरोधात युद्ध लढणार नाहीत, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी स्पष्ट केलंय. न लढण्यामागचं कारण देत ते म्हणाले की, नेटो आणि अमेरिकेचा रशियासोबत संघर्ष झाल्यास ते तिसरं महायुद्ध असेल. शिवाय आम्ही नेटोच्या प्रत्येक इंच प्रदेशाचे रक्षण करू, असंही बायडेन म्हणाले आहेत.
“आम्ही युरोपमधील आमच्या मित्र राष्ट्रांसोबत एकत्र उभे राहणार आहोत आणि एक संदेश पाठवणार आहोत. आम्ही संयुक्त आणि गॅल्वनाइज्ड नेटोच्या संपूर्ण सामर्थ्याने नेटो प्रदेशाच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करू,” असं जो बायडेन रशियावर अतिरिक्त निर्बंधांची घोषणा केल्यानंतर म्हणाले.
“आम्ही युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध युद्ध लढणार नाही. नेटो आणि रशिया यांच्यातील थेट संघर्ष हे तिसरे महायुद्ध असेल, त्यामुळे ते रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असंही ते म्हणाले.
गुरुवारी व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी यांनी सांगितले की, “युक्रेनमध्ये अपारंपरिक शस्त्रे वापरली जात असली तरीही युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याचा अमेरिकेचा कोणताही हेतू नाही.” दरम्यान, बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून बातचीत केली आणि युक्रेनियन लोकांसाठी अमेरिकेकडून देण्यात येणारी सुरक्षा, मानवतावादी आणि आर्थिक मदत यावर चर्चा केली.