उत्तर प्रदेशमधील खतौली येथील उत्कल एक्स्प्रेसच्या अपघातामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विरोधकांनी सुरेश प्रभूंच्या राजीनाम्याची मागणी केली असतानाच प्रभूंनीही रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. अपघाताची जबाबदारी निश्चित करुन दोषी कोण आहे याचा अहवाल संध्याकाळपर्यंत सादर करावा असे आदेश प्रभूंनी दिले आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी या अपघाताप्रकरणी भारतीय दंड विधानातील ३०४ अ अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हलगर्जीपणामुळे मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरी- हरिद्वार उत्कल एक्स्प्रेस एक्स्प्रेसला शनिवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशमध्ये अपघात झाला. मुजफ्फरनगरच्या खतौली जवळ १४ डबे रुळावरुन घसरून एकमेकांवर धडकल्याने २० प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यावर टीका सुरु झाली आहे. गेल्या २ वर्षात आठ रेल्वे अपघात झाले असून यामध्ये १९० हून अधिक प्रवाशांना जीव गमवावा लागला. सुरेश प्रभूंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत असून या अपघाताची सुरेश प्रभूंनीही गंभीर दखल घेतली आहे. शनिवारी संध्याकाळीच सुरेश प्रभूंनी यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले होते.

रविवारी सकाळी सुरेश प्रभूंनी रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टिमेटमच दिले. रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांना प्रभूंनी अपघाताची जबाबदारी निश्चित करुन दोषींविरोधात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत अपघाताप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त होईल असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे पोलिसांनी या अपघाताप्रकरणी भारतीय दंडविधानातील कलम ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हलगर्जीपणामुळे मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर आता या मार्गावरील वाहतूक सुरु करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader