पीटीआय, नवी दिल्ली : पर्ल्स समूहाचे संचालक हरचंदसिंग गिल यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. या कंपनीद्वारे झालेल्या कोटय़वधींच्या गुंतवणूक घोटाळय़ाप्रकरणी त्यांना फिजीमधून हस्तांतरित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
परदेशात फरार झालेल्यांना परत आणण्यासाठी ‘सीबीआय’ने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन त्रिशूल’अंतर्गत गिल यांना सोमवारी रात्री उशिरा फिजी येथून आणण्यात आले. ही मोहीम गेल्या वर्षी सुरू झाल्यापासून ३० फरार आरोपींना भारतात यशस्वीरित्या आणल्याचा दावा ‘सीबीआय’ने केला आहे. ‘इंटरपोल’च्या सहाय्याने गुन्ह्याची प्रक्रिया व फरार आरोपींचे भौगोलिक स्थान शोधणे व त्यांना परत आणणे हे ‘ऑपरेशन त्रिशूल’ मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
‘सीबीआय’ने १९ फेब्रुवारी २०१४ रोजी पर्ल्स समूह व त्याचे संस्थापक निर्मलसिंग भांगू यांच्याविरोधात चौकशी सुरू केली होती. त्यांच्याविरुद्ध गुंतवणुकीच्या मोबदल्यात जमीन देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधी गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या कंपनीने देशभरातील गुंतवणूकदारांची ६० हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ‘सीबीआय’ने केला आहे.