Kartik Kansal UPSC : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या बोगस अंपगत्व प्रमाणपत्राची चर्चा सुरू झाल्यानंतर अशा प्रकारची अनेक प्रकरणे बाहेर आली. सोशल मीडियावर अशा अनेक अधिकाऱ्यांचे किस्से समोर येऊ लागले, ज्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून यूपीएससीद्वारे नागरी सेवेत प्रवेश केला. मात्र यादरम्यान अशीही प्रकरणे आहेत, ज्यामध्ये दिव्यांग उमेदवाराने परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना नागरी सेवेत पोस्टिंग दिलेली नाही. कार्तिक कंसल हे मस्क्यूलर डिस्ट्रॉफी या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत. त्यांनी चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र त्यांना नागरी सेवेत सामावून घेण्यात आले नाही.
कार्तिक कंसल यांनी आयआयटी रुरकीमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून सध्या ते इस्रोमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय भरती प्रक्रियेद्वारे त्यांची या पदासाठी निवड झाली. कार्तिक वयाच्या १४ व्या वर्षांपासून व्हिलचेअर वापरत आहेत. त्यांनी २०१९ (८१३ रँक), २०२१ (रँक २७१), २०२२ (रँक ७८४) आणि २०२३ (रँक ८२९) अशी एकूण चारवेळा यूपीएससी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण केली.
हे वाचा >> विश्लेषण : अपंगत्व प्रमाणपत्र मिळते कसे? पूजा खेडकरप्रकरणी काय घडले?
२०२१ साली कार्तिक यांचा रँक २७१ वा होता. अंपगांसाठी राखीव नसलेल्या खुल्या वर्गातून परीक्षा देऊनही कार्तिक यांना आयएएसची पोस्टिंग देण्यात आली नाही. त्याचवर्षी त्यांच्यामागे म्हणजेच २७२ आणि २७३ व्या रँकिंगवर असलेल्या उमेदवारांना मात्र आयएएस करण्यात आले. तथापि, २०२१ साली आयएएस पदासाठी मस्क्यूलर डिस्ट्रॉफी हा आजार ग्राह्य धरला गेला नाही.
सेरेब्रल पाल्सी आजाराला सूट तर मग मस्क्यूलर डिस्ट्रॉफी का नाही?
मस्क्यूलर डिस्ट्रॉफी आजार असलेल्या उमेदवारांना भारतीय महसूल सेवा (प्राप्तिकर) गट अ आणि भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क) या सेवांमध्ये सामावून घेण्यात येते. या दोन पोस्ट कार्तिक कंसल यांच्या द्वितीय आणि तृतीय पसंतीच्या पोस्ट होत्या. २०१९ साली कार्तिक कंसल यांचे देशभरातून ८१३ वे रँकिंग होते. त्यावेळी त्यांना सहज पोस्टिंग देता आली असती. कारण लोकोमोटर अंपगत्वासाठी १५ जागा होत्या आणि केवळ १४ जागा भरण्यात आल्या. अशावेळी सेरेब्रल पाल्सी हा आजार असलेल्यांना सेवेत घेतले जात असेल तर इतर दुर्मिळ आजार असलेल्यांना का घेतले जात नाही? असा एक प्रश्न उपस्थित करण्यात आला.
तर २०२१ साली, लोकोमोटर अंपगत्व श्रेणीमध्ये सात जागा रिक्त होत्या आणि त्यापैकी फक्त चार जागा भरल्या गेल्या होत्या. या श्रेणीतही कार्तिक यांनी प्रथम क्रमांक मिळविला होता.
कार्तिक यांच्या आजाराबाबत एम्सने काही सूचना दिल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यांनुसार, कार्तिक यांना स्नायूंचा आजार असून त्यांचे दोन्ही हात आणि पाय मस्क्यूलर डिस्ट्रॉफी आजारामुळे काम करत नाहीत. ज्या व्यक्तीचे दोन्ही हात-पाय काम करत नसतील तरी त्यांना हे पद देण्यात येते. मात्र मस्क्यूलर डिस्ट्रॉफी आजाराने ग्रस्त असलेल्या आयएएस करता येत नाही, असा यूपीएससीचा नियम आहे.
कार्तिक कंसल यांचे अंपगत्वाची पातळी ६० टक्के होती. मात्र एम्सने ती ९० टक्के असल्याचे सांगितले. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी संजीव गुप्ता यांनी कार्तिकच्या समर्थनार्थ पुढे येऊन पोस्ट केली होती. कार्तिकने परीक्षा देतेवेळी फक्त शौचालयाला जाण्यासाठी दुसऱ्याची मदत घेतली होती. बाकी त्यानेच स्वतःहून पेपर सोडविला. आयएएस आणि आयआरएस पदासाठी ज्या शारीरिक उपयुक्तता असायला हव्यात, त्या सर्व निकषांवर कार्तिक योग्य उमेदवार होता.
कार्तिकने ज्यावेळी त्याला मिळालेल्या नकाराचे कारण विचारले, तेव्हा त्याला सांगण्यात आले की, PWBD उमेदवारांना विविध विभागाच्या नियंत्रक प्राधिकरणांनी घालून दिलेल्या नियमांच्या आधारावर तपासून घेतले जाते. तुम्हाला जो रँक मिळाला, तो पाहता तुमच्याशी जुळणारी पोस्ट सध्या देता येत नाही.
नागरी सेवेत काम करण्याबाबत प्रतिक्रिया देताना कार्तिक कंसलने सांगितले की, मला आयएएस होऊन समाजासमोर एक उदाहरण प्रस्थापित करायचे होते. माझ्यासारखे लोकही ठरवले तर काहीही करू शकतात, हे मला दाखवून द्यायचे होते. पण हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर मी अधिक भाष्य करणार नाही.