पीटीआय, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची बुधवारी दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेदरम्यान अनौपचारिक भेट झाली. या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबद्दल तातडीने माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, दोन दिवसांनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांतर्फे अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली. मात्र ही माहिती विसंगत असल्यामुळे या भेटीमधील चर्चेविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिक्स परिषदेमध्ये भारत आणि चीनदरम्यान स्वतंत्र औपचारिक बैठक ठरवण्यात आली नव्हती, सर्व राष्ट्रप्रमुख पत्रकार परिषदेसाठी जात असताना मोदी आणि क्षी यांच्या दरम्यान अनौपचारिक चर्चा झाल्याचे दृश्य प्रसिद्ध झाले. यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंडोनेशियातील बाली येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. मात्र, भारताच्या परराष्ट्र विभागाने त्याविषयी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नव्हती.

चीनकडून द्विपक्षीय बैठकीची विनंती करण्यात आली असून अद्याप ती प्रलंबित आहे असे भारतीय परराष्ट्र खात्यातील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यापूर्वी चीनच्या परराष्ट्र विभागाने या बैठकीविषयी एक निवेदन प्रसिद्ध केले. चीनच्या म्हणण्यानुसार, ‘‘भारताच्या विनंतीनंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष क्षी यांच्यादरम्यान संभाषण झाले’’. तर भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी गुरुवारी या संभाषणाविषयी माहिती देताना सांगितले की, ‘‘पंतप्रधान मोदी यांनी पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ न सुटलेल्या मुद्दय़ांबद्दल वाटणारी चिंता क्षी यांना बोलून दाखवली’’.

भारताचे म्हणणे काय?

ब्रिक्स शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी ब्रिक्स गटातील इतर देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. पंतप्रधानांनी पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ न सुटलेल्या मुद्दय़ांबद्दल वाटणारी चिंता क्षी यांना बोलून दाखवली. पंतप्रधान मोदी यांनी क्षी यांच्याशी बोलताना ही बाब अधोरेखित केली की, भारत आणि चीनदरम्यान संबंध सामान्य होण्यासाठी सीमाभागात शांतता आणि सलोखा कायम राहणे अत्यावश्यक आहे. यासंबंधी दोन्ही देशांनी आपापल्या देशातील संबंधित अधिकाऱ्यांना तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न वाढवण्याचे निर्देश द्यावेत यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

चीनचे म्हणणे काय?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ ऑगस्टला केलेल्या विनंतीवरून अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्याशी संभाषण केले. या संभाषणामध्ये क्षी यांनी सांगितले की, भारत-चीन संबंध सुधारण्यामध्ये दोन्ही देशांचे हित आहे आणि जागतिक व प्रादेशिक शांतता व स्थैर्यासाठी हितकारक आहे. दोन्ही देशांमध्ये प्रामाणिकपणे आणि सखोल चर्चा झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussed in narendra modi xi jinping meeting different information from both countries ysh
Show comments