वाद-विवाद, संवाद हाच संसदेचा आत्मा असून, इतर कामांसाठी देशाचे मैदान उपलब्ध आहे. माझी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा झाली असून, सभागृहाचे कामकज उत्तम पद्धतीने चालवले जावे, यावर सगळ्याचे एकमत झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना मोदी म्हणाले, संसदेच्या दोन्ही सभागृहात उत्तम विचार मांडले गेले पाहिजेत. नव्या नव्या कल्पना पुढे आल्या पाहिजेत. त्यातून संसदेचे वेगळेपण उठून दिसले पाहिजे. संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालावे, यासाठी माझी सर्वपक्षीय नेत्यांसोबत कालच चर्चा झाली. सभागृहाचे कामकाज उत्तम पद्धतीने चालावे, यासाठी सर्वच नेत्यांनी एकमत व्यक्त केले आहे. वाव-विवाद, संवाद हाच संसदेचा आत्मा आहे. बाकी कामांसाठी देशाचे मैदान उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कामकाज होऊ शकले नव्हते. देशासाठी महत्त्वाचे असलेले वस्तू व सेवा कर विधेयक त्या अधिवेशनातील गोंधळामुळे मंजूर होऊ शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन केंद्र सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Story img Loader