आयएनएस अरिहंत ही भारतीय बनावटीची नौदलातील पहिलीच आण्विक पाणबुडी दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनात दाखल करून, भारत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार अशी चर्चा सध्या विशाखापट्टणम येथे रंगली आह़े स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी तयार करणाऱ्या अमेरिका, ब्रिटन, चीन आणि रशिया या देशांबरोबर आता भारताचाही समावेश झाला आहे.
नौदलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८३ मेगावॉटची अतिउच्चदाब असलेली समृद्ध युरेनियमचा वापर केली जाणारी अणुभट्टी हे या आयएनएस अरिहंतचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. आण्विक पाणबुडी असल्याने ती दीर्घकाळ पाण्याखाली राहून कारवाई करण्याची क्षमता राखते. अन्यथा चार ते पाच दिवसांनंतर इतर पाणबुडय़ांना विद्युत भारासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते, अशा वेळेस शत्रूच्या नजरेस पडण्याचा धोका अधिक असतो. शिवाय अणुइंधनामुळे आयएनएस अरिहंत या पाणबुडीचा वेगही अधिक आहे आणि ऊर्जास्रोतच बळकट असल्याने इतर यंत्रणांची कार्यक्षमताही एरवीपेक्षा अधिक आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएनएस अरिहंतवर चार उभ्या अवस्थेत डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्र प्रक्षेपकांची सुविधा आहे. त्यासाठी भारतीय संशोधन आणि विकास संस्था असलेल्या डीआरडीओने के-१५ व के-४ ही दोन अद्ययावत क्षेपणास्त्र विकसित केली आहेत. ही दोन्ही दुतर्फा मारा करण्याची क्षमता असलली क्षेपणास्त्रे आहेत. यातील के-४ ची क्षमता ३ हजार ५०० किमीपर्यंत मारा करण्याची आहे. याशिवाय यावरील अणुभट्टी विकसित करण्यामध्ये कल्पकम आणि मुंबईतील तुभ्रे येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातील संशोधकांचा मोलाचा वाटा आहे.
शत्रूचा अंत करणारी म्हणून अरिहंत असे या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले असून तिचा आराखड अकुला वर्गातील पाणबुडीशी साधम्र्य असलेला आहे. तिचे वजन तब्बल सहा हजार टन असून विशाखापट्टणम येथील जहाज बांधणी केंद्रातील अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हेसल प्रोजेक्ट सेंटरमध्ये तिची बांधणी करण्यात आली आहे.
आयएनएस अरिहंतवरील छोटेखानी अणुभट्टीच्या उभारणीचे प्राथमिक प्रयोगात्मक काम कल्पकम येथील केंद्रात करण्यात आले आणि २००६ च्या सप्टेंबर महिन्यात ती कार्यरतही झाली. त्यानंतरच्या तीन वर्षांत केलेल्या चाचण्यांनंतर पाणबुडीवरील अणुभट्टीची प्रत्यक्ष उभारणी करण्यात आली. एल अँड टी या हझिरा शिपबििल्डग विभागात पाणबुडीच्या तळाचा भाग तयार करण्यात आला तर टाटा पॉवरने पाणबुडीच्या वीजजोडणी व नियंत्रणाचे काम पाहिले. टर्बाइनची निर्मिती वालचंदनगर इंडस्ट्रीजतर्फे करण्यात आली आहे.