वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने देश हादरला होता. तिचा प्रियकर आफताब अमिन पूनावालाने श्रद्धाचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून मेहरोलीतील जंगलात फेकून दिले होतं. तब्बल सहा महिन्यानंतर ही घटना समोर आली होती. याप्रकरणी आता चार्जशीट दाखल झालं आहे. या चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, आफताने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर तिचं शीर वेगळं ठेवलं होतं. खून केल्यावर तीन-चार महिन्यानतंर आफताबने तिचा चेहरा आणि डोक्यावरील केस ब्लो टॉर्चने ( छोटा गॅस ) जाळण्याचा प्रयत्न केला. कारण, कोणालाही श्रद्धाची ओळख पटू नये म्हणून, अशी खळबळजनक माहिती चार्जशीटमध्ये देण्यात आली आहे.
हेही वाचा : ‘गौतम अदाणींकडून २० वर्षांत भाजपाला किती रुपये?’ राहुल गांधींचा सवाल; मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “अगोदर…”
श्रद्धाचं इन्स्टाग्राम अकाऊंट आफताब वापरायचा
श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबने आपल्या मोबाईलमध्ये तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं होतं. श्रद्धाला तिचा मित्र लक्ष्मण नाडर याने इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. त्याच्या मेसेजला उत्तरही आफताबने दिलं होतं, असं चार्जशीटमध्ये सांगितलं आहे.
७५ दिवसांत पोलिसांनी दाखल केली चार्जशीट
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांनी ७५ दिवसांत चार्जशीट दाखल केलं आहे. पहिल्यांदा पोलिसांनी आफताबची नार्को चाचणी केली होती. दुसऱ्यांदा पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. यामध्ये आफताबला पोलिसांनी वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं.
हेही वाचा : अदाणींबरोबर पंतप्रधान मोदींचे संबंध काय? थेट राहुल गांधींनी संसदेत फोटो दाखवले; म्हणाले…
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी हातोडा, खिळे अन्…
दरम्यान, यापूर्वी नार्को चाचणीत आफताबने म्हटलं होतं की, श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी चायनीज चॉपरचा वापर केला होता. त्याप्रमाणे हातोडा, खिळे आणि करवत वापरल्याचाही खुलासा आफताबने केला आहे. यापूर्वी पोलिसांनी एक करवत आणि आणि चाकू पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटवरून जप्त केला होता.