Chennai Coromandel Express Accident : गेल्या तीन दशकाहून सर्वाधिक भीषण ठरलेल्या रेल्वे अपघाताला आता दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. या घटनेतील नवनवीन माहिती सातत्याने समोर येतेय. याप्रकरणी सीआरएस आणि सीबीआयद्वारे चौकशी सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, कोरोमंडल एक्स्प्रेसचा लोकोपायलट गुणनिधी मोहंती यांना त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापही भेटू दिलेले नाही. अपघात झाल्यापासून गुणनिधी यांना आपण भेटलोच नसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे ते नक्की कुठे आहेत हेसुद्धा स्पष्ट झालेलं नाही.
गुणनिधी हे कटकच्या गजबजलेल्या शहरापासून १० किमी अतंरावर असलेल्या नाहपाडा येथे राहतात. अपघात झाल्यापासून या गावात एकच चर्चा आहे. गुणनिधीच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचं दबक्या आवाजात या गावात बोललं जातंय. “गावातील प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा या अपघाताला जबाबदार आहे. पण तो गेल्या २७ वर्षांपासून ट्रेन चालवत आहे. त्याने कधीही चूक केली नव्हती. त्या संध्याकाळी काय झालं ते कसं कळणार? मी माझ्या मुलाशी बोललो सुद्धा नाहीय. मी फक्त तो घरी येण्याची वाट पाहतोय”, अशी प्रतिक्रिया गुणनिधी यांचे ८० वर्षीय वडिल बिष्णू चरण मोहंती यांनी दिली. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
गुणनिधी अपघातात गंभीर जखमी
२ जून रोजी ओडिशातील बालासोरच्या बहनगा बाजार स्थानकात तीन रेल्वे एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात २५० हून अधिक प्रवासी मृत झाले. तर, हजारोंहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या तीन रेल्वेंपैकी एक रेल्वे होती कोरोमंडल एक्स्प्रेस. कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये गुणनिधी मोहंती हे पायलट होते. या अपघातात गुणनिधी जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. त्यांच्यावर भुवनेश्वरमधील एएमआयआय रुग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हापासून माजी सैनिक बिष्णू शरण आपल्या मुलाच्या परत येण्याची वाट पाहत आहेत.
अपघात झाल्याचे कळताच गुणनिधी यांचे भाऊ रणजित मोहंती आपल्या भावाला भेटण्याकरता रुग्णालयात गेले होते. मात्र, रुग्णालयात या दोघांची अल्पकाळच भेट होऊ शकली. गुणनिधी यांच्याकडे मोबाईल ठेवण्यासही मज्जाव करण्यात आला. “गुणनिधीला खूप त्रास होत होता, तिथे माझी वहिनीही उपस्थित होती. परंतु, तिची तरी भावासोबत भेट झाली की नाही हे माहिती नाही”, असंही गुणनिधी यांचे भाऊ रणजित म्हणाले.
हेही वाचा >> Odisha Train Derailed : ४० मृतदेहांवर जखमांचे व्रण नाहीत, रक्ताचा थेंबही नाही; मग मृत्यूचं कारण काय? पोलीस म्हणतात…
गुणनिधी यांना चार दिवसांपूर्वी सोडण्यात आले असल्याची माहिती ईस्ट कोस्ट रेल्वेच्या वैद्यकीय विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. परंतु, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुणनिधी कुठे आहेत हे त्यांच्या वडील आणि भावांना माहित नसल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. “माझ्या भावाबद्दल आम्हाला काहीही सांगण्यात आले नाही. मला वाटतं की तो अजूनही रुग्णलायातच आहे. पण मला याबाबत खात्री नाही”, अशी प्रतिक्रिया रणजित यांनी दिली.
गुणनिधी यांच्याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ
“गुणनिधी यांच्या प्रकृतीविषयी आम्ही माहिती देऊ शकत नाही. कारण आरोग्य हा फार खासगी विषय आहे. हे प्रकरण सीआरएस आणि सीबीआयकडे प्रलंबित असल्याने आम्ही यासंदर्भात अधिक माहिती देऊ शकत नाही”, अशी माहिती ईस्ट कोस्ट रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली.
गुणनिधी यांचा मोठा भाऊ संजय मोहंती यांनी माहिती दिली की, “गुणनिधी १९९६ साली लोको पायलट म्हणून रुजू झाले. सुरुवातीला ते मालगाडी रेल्वेत पायलट होते. काही वर्षांपूर्वीच ते पॅसेंजर ट्रेनमध्ये पायलट म्हणून कार्यरत झाले. सगळ्यांना वाटतंय की या अपघाताला माझा भाऊच जबाबदार आहे. पण, रेल्वेच्या रुळांवर पायलटचं फार नियंत्रण नसतं. तो याविषयी आम्हाला माहिती देईलच. एखाद्या मार्गावरून रेल्वे रवाना करण्याची जबाबदारी कर्तवव्यावर असलेल्या रेल्वे मास्तराची असते. त्या मार्गावरून कोरोमंडल एक्स्प्रेसला धावण्याकरता १३० किमीची मर्यादा असताना एक्स्प्रेस मात्र १२८ किमी प्रतितास वेगाने धावत होती.”
हेही वाचा >> Odisha Accident : ‘एलएचबी’ डबे नसते तर मृतांची संख्या वाढली असती; एलएचबी डब्यामुळे अपघाताची तीव्रता कमी झाली?
ओडिशा तिहेरी रेल्वे दुर्घटना घडल्यानंतर रेल्वे बोर्डाचे ऑपरेशन आणि बिझनेस डेव्हलोपमेंट अधिकारी जया वर्मा सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले होते की, “आम्ही चालकाशी बोललो आहोत. त्याने आम्हाला सांगितलं की एक्स्प्रेससाठी हिरवा सिग्नल देण्यात आला होता. हिरवा सिग्नल म्हणजे पुढचा मार्ग प्रवासासाठी खुला असणे. तसंच, चालक त्याला दिलेल्या मर्यादेत तिथून एक्स्प्रेस नेऊ शकतो. या मार्गावरून रेल्वे धावण्यास १३० किमी प्रतितासाची वेगमर्यादा घालून देण्यात आली आहे. अपघातावेळी एक्स्प्रेसची वेगमर्यादा १२८ किमी प्रतितास होती. त्यामुळे चालकाने सिग्नल तोडला नाही, तसंच त्यांनी वेगही मोडलेला नाही.”